राज्यात आज पुन्हा एकदा दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनातून बरे झालेल्यांची संख्या जास्त आढळून आली आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ३४२ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ७५५ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, ५५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अजुनही पूर्णपणे ओसरलेली नाही, अद्यापही रोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येत भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येताना दिसत आहे. राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत, मात्र जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत व करोनाबाधितांची संख्येत वाढ सुरू झाली तर, पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा इशारा देखील दिला गेला आहे.

राज्यात आजपर्यंत ६२, ८१, ९८५ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतली आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के झाला आहे.

आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,७३,६७४ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७५५१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के आहे.

राज्यात आजपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आलेल्या ५,४३,२७,४६९ नमुन्यांपैकी ६४,७३,६७४ नमूने पॉझिटिव्ह (११.९२ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८७,३८५ जण गृहविलगीकरणात आहेत आणि १ हजार ९७१ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. याशिवाय, राज्यात आज रोजी ५०,६०७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.