आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजरा ४१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४९ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९ लाख १५ हजार ६८३ नमुन्यांपैकी १८ लाख २८ हजार ८२६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३८ हजार ८४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार २४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ८९ हजार ९८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ४ हजार ९३० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १८ लाख २८ हजार ८२६ झाली आहे. आज नोंद झालेल्या ९५ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २० मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.