राज्यातील करोना संसर्ग अद्यापही दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउनचा कालावधी देखील वाढवण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील रूग्ण वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ५४ हजार २२ करोनाबाधित वाढले असून, ८९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे.

याशिवाय आज ३७ हजार ३८६ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४२,६५,३२६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.३६ टक्के एवढे झाले आहे.

· आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८९,३०,५८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,९६,७५८ (१७.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,४१,४३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,५४,७८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid third wave : राज्यात तातडीने ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती होणार – टोपे

राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यात तातडीने ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती केली जाणार असल्याचं यावेळी टोपेंनी सांगितलं.