राज्यातील करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर काही कडक निर्णय घेण्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक देखील बोलावली होती. एकीकडे राज्यात लसीकरण मोहिमेत अडथळे निर्माण होताना दिसत असून, दुसरीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारसमोर आता कडक लॉकडाउनच्या निर्णया शिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचं दिसत आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ५५ हजार ४११ नवीन करोनाबाधित वाढले असून, ३०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के एवढा आहे.

दरम्यान, आज ५३ हजार ००५ रुग्ण करोनातून बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.१८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

“आज आपण लॉकडाउनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या ….”

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, “रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाउनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाउनसारखी परिस्थिती उद्भवेल.”, असं सूचक विधानही केलं. त्यामुळे राज्यात लवकरच लॉकडाउनबाबत मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचं दिसत आहे.

पुण्यात दिवसभरात ४ हजार ९५३ करोनाबाधित वाढले, ४६ रूग्णांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ९५३ करोनाबाधित वाढले असून, ४३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख २२ हजार ९८२ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार ७०० रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान आज ४ हजार ३८९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर २ लाख ६६ हजार ८०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.