राज्यात दिवसेंदिवस करोना विषाणूचा संसर्ग अधिकच वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल ५६ हजार २८६ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ३७६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५७ हजार २८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, आज रोजी राज्यात एकूण ५,२१,३१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज ३६ हजार १३० रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २६,४९,७५७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.०५ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१३,८५,५५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,२९,५४७ (१५.१० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,०२,६१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,६६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रावर अन्याय का? आकडेवारी देत राजेश टोपेंनी केला मोदी सरकारवर गंभीर आरोप!

तर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या आरोपांनंतर आज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर  गंभीर आरोप केले. तर, “ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत”, असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. त्यासोबतच, त्यांनी राज्यातील रुग्णांची आकडेवारी देऊन मिळणाऱ्या लसींचं प्रमाण कसं कमी आहे, त्याविषयी देखील पत्रकार परिषदेत माहिती दिली.