राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक सुरूच आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले असून, शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असतानाही रूग्ण संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात ५७ हजार ७४ नवीन करोनाबाधित आढळले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.८६ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर,  आज रोजी राज्यात एकूण ४,३०,५०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ठरलं! महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन

दरम्यान, आज २७ हजार ५०८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५,२२,८२३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८३.८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०५,४०,१११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,१०,५९७ (१४.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,०५,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Break The Chain : महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध; अशी आहे नियमावली

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश आणि नियमावली उद्या सरकारकडून काढण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येणार.