राज्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कठोर पावलं उचलत राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाउनची घोषणा देखील केली आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांचा संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात ५८ हजार ९९३ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३०१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.७४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५७ हजार ३२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ५, ३४, ६०३ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

दरम्यान, आज ४५ हजार ३९१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २६,९५,१४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.९६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१६,३१,२५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,८८,५४० (१५.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९५,०६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,१५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्र सरकारने केला Break The Chain नियमावलीमध्ये नव्या बदलांचा समावेश!

गेल्या आठवड्यात राज्य सरकारने जाहीर केलेल्या Break The Chain नियमावलीमध्ये काही नव्या बदलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये RTPCR चाचणी सक्तीची करण्यासंदर्भातल्या नियमाप्रमाणेच इतर काही नियमांमध्ये केलेल्या बदलांचा समावेश आहे. या बदलांमुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच, आपलं सरकार सेवा केंद्र, सेतू, सीएससी अशा एक खिडकी सेवा शनिवार-रविवार वगळता आठवड्याच्या इतर दिवशी सुरू ठेवण्याची परवानगी देखील नव्या बदलांनुसार देण्यात आली आहे.

पुण्यात दिवसभरात ५ हजार ६४७ कोरनाबाधित वाढले –

पुण्यात दिवसभरात ५ हजार ६४७ कोरनाबाधित वाढले असून, ४४ रूग्णांचा मृत्यू शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख १८ हजार २९ इतकी  झाली आहे.  आजपर्यंत ५ हजार ६५४ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.  दरम्यान आज ४ हजार ५८७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ६२ हजार ४२० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.