राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासनाकडून १५ दिवसांचा लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील करोनाबाधित मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आज दिवसभरात राज्यात ६१ हजार ६९५ नवीन करोनाबाधित वाढले असून, ३४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६३ टक्के एवढा आहे.

दरम्यान, आज ५३ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २९,५९,०५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.३ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यात दिवसभरात ५ हजार ३९५ करोनाबाधित आढळले, ४९ रूग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ५ हजार ३९५ करोनाबाधित आढळले असून, ४९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आजअखेर ३ लाख ४९ हजार ४२४ झाली आहे. तर आजपर्यंत ५ हजार ९५१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ४ हजार ३२१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ८९ हजार १२२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus – पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पत्र, म्हणाले…

दरम्यान, राज्यातल्या ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत. आपत्ती निवारण निधीसंदर्भात मदतीचे निकष बदलण्यात यावेत अशी एक प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

‘रेमडेसिवीर’साठी आता निर्यात बंदी असलेल्या कंपन्यांकडून माल घेण्याचे प्रयत्न सुरू – टोपे

राज्यात एकीकडे करोना संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे रूग्णांना आवश्यक असलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ही बाब मान्य केलेली आहे. अनेक ठिकाणी रूग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर हा पुरवठा वाढवण्यासाठी व राज्य सरकारकडून कोणते प्रयत्न सुरू आहेत, याबाबत आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.