X

Coronavirus – चिंताजनक : राज्यात दिवसभरात ६३ हजार २९४ करोनाबाधित वाढले, ३४९ मृत्यू

राज्यात आज रोजी एकूण ५,६५,५८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात करोना संसर्गाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेतही लसींच्या तुटवड्यामुळे अडथळे निर्माण होताना दिसत आहे. राज्य शासन कठोर लॉकडाउन लागू करण्याच्या तयारीत आहे. निर्बंध अधिक कडक करण्यात आले असूनही रूग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार २९४ करोनाबाधित वाढले असून, ३४९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५७ हजार ९८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आज रोजी एकूण ५,६५,५८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान आज ३४ हजार ००८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २७,८२,१६१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.६५ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२१,१४,३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४,०७,२४५ (१५.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३१,७५,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससमवेत झाली महत्वपूर्ण बैठक; सर्वसमावेशक ‘एसओपी’ तयार केली जाणार

राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसीवरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्य्यांवर विस्तृत चर्चा झाली. बैठकीत मुख्यंत्र्यांनी प्रशासनाला काही विशेष निर्देश देखील दिले. तर, नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

पुण्यात दिवसभरात ६ हजार ६७९ करोनाबाधित वाढले, ४८ रूग्णांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात ६ हजार ६७९ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, ४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आजअखेर ३ लाख २९ हजार ६६१ झाली आहे. तर, आजपर्यंत ५ हजार ७४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ४ हजार ६२८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ७१ हजार ४३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

20
READ IN APP
X