राज्यात करोनाबाधितांच्या संख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून खाली येताना दिसत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात ६ हजार ४०६ करोनाबाधितांची नोंद झाली. तर ६५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

गुरूवारी राज्यात ६ हजार ४०६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर ६५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, ४ हजार ८१५ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १८ लाख २ हजार ३६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १६ लाख ६८ हजार ५३८ जणांनी करोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४६ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला असून ८५ हजार ९६३ अॅक्टिव केसेस असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

पुण्यात एकाच दिवसात ४३० रुग्ण

पुणे शहरात दिवसभरात ४३० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्याही १ लाख ६८ हजार ४६० इतकी संख्या झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत १ लाख ५८ हजार ६९४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही आज दिवसभरात २३९ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ जण करोनामुक्त झाले आहेत.