देशभरासह राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कालप्रमाणे आज देखील राज्यात दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट आहे. तर, १८७ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आज ८ हजार ५२२ नवे करोनाबाधित आढळले असून, १५ हजार ३५६ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८४.०३ टक्क्यांवर पोहचला आहे.

राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १५ लाख ४३ हजार ८३७ वर पोहचली आहे. यामध्ये २ लाख ५ हजार ४१५ अॅक्टिव केसेस, करोनामुक्त झालेले १२ लाख ९७ हजार २५२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४० हजार ७०१ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

सद्यस्थितीस २३ लाख ३७ हजार ८९९ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २५ हजार ८५७ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासल्या गेलेल्या ७७ लाख ६२ हजार ०५ नमून्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमूने(१९.८९ टक्के) करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.