देशभरासह राज्यात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल ९ हजार ४३१ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, २६७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ३ लाख ७५ हजार ७९९ वर पोहचली आहे.

राज्यभरातील एकूण ३ लाख ७५ हजार ७९९ करोनाबाधितांच्या संख्येत, सध्या उपचार सुरू असलेल्या १ लाख ४८ हजार ६०१ जणांचा  व आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या २ लाख १३ हजार २३८ जणांचा समावेश आहे. राज्यात करोनातून बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ५६.७४ टक्क्यांवर आले आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील मृत्यू दर ३.६३ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या तब्बल १८ लाख ८६ हजार २९६ नमून्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७९९ (१९.९२ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस ९ लाख ८ हजार ४२० नागरिक गृह विलगीकरणात आहेत. तर, ४४ हजार २७६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्याही त्या प्रमाणात वाढवणं आवश्यक असल्याचं मत यापूर्वी अनेकांनी व्यक्त केलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उद्या (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांच्या हस्ते ‘आयसीएमआर’च्या अत्याधुनिक चाचणी केंद्रांचं उद्धाटन करण्यात येणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी या केंद्रांचं उद्धाटन करणार आहेत. तसंच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील उपस्थित असणार आहे.