20 November 2017

News Flash

कोकण पर्यटनाने संघर्ष यात्रेचा सुखान्त

कोकणातील प्रश्नांची चर्चा नाही

सतीश कामत, रत्नागिरी | Updated: May 20, 2017 2:52 AM

या संपूर्ण प्रवासात चिपळूण तालुक्यातील सावर्डे या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या घरच्या मैदानावर एकमेव जाहीर मेळावा झाला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीबाबत आवाज उठवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजणाऱ्या उन्हाळ्यात काढलेल्या संघर्ष यात्रेची गेल्या गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यत सावंतवाडी येथे सांगता झाली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे या यात्रेचे चार टप्पे करण्यात आले होते. त्यापैकी कोकण या चौथ्या टप्प्याचा प्रारंभ गेल्या बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यतून झाला. त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे इत्यादी नेतेमंडळी या टप्प्यामध्ये सहभागी झाली होती. मात्र रायगड जिल्ह्यतील राष्ट्रवादी-शेतकरी कामगार पक्षाची ताकद असलेल्या भागात जाण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. केवळ रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि महाडला चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या अलीकडे जास्त राजकीय पर्यटनस्थळ बनलेल्या ठिकाणी हजेरी लावून खेड, चिपळूणमार्गे त्याच दिवशी संध्याकाळी ‘यात्रेकरू’ गणपतीपुळे या धार्मिक पर्यटनस्थळी जाऊन विसावले.

या संपूर्ण प्रवासात चिपळूण तालुक्यातील सावर्डे या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या घरच्या मैदानावर एकमेव जाहीर मेळावा झाला. पण तेथेही ‘शेखर सरां’च्या स’ााद्री शिक्षण संस्थेची ‘कुमक’ नसती तर कार्यक्रम होऊच शकला नसता, अशी परिस्थिती होती. या मेळाव्यात सर्व नेतेमंडळींनी राज्यातील सत्ताधारी भाजपच्या शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या हाती कोलितच दिलं. पण विधिमंडळासह राज्यभर वारंवार उगाळल्या गेलेल्या मुद्दय़ांपलीकडे त्यात फारसे काही नव्हतं. त्यातल्या त्यात भावी राजकीय भवितव्याबाबत भरपूर चर्चेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी या मेळाव्याला हजेरी लावल्यामुळे ते काय बोलणार, याबाबत उत्सुकता होती. त्यांनी नेहमीचाच उद्धव ठाकरेविरोधी टवाळकीचा सूर सराईतपणे आळवला, पण शेतीविषयक धोरणांचे सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपबाबत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे त्यांच्या आशा अजून कायम असल्याचंच ध्वनित झालं.

कोकणातील यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, गेल्या गुरुवारी सकाळी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन नेतेमंडळींनी राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यकडे कूच केलं. मार्गावर राणेंच्या कट्टर समर्थक आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या पुढाकारामुळे लांजा व राजापूर येथे कार्यकर्त्यांकडून स्वागताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कणकवलीत राणेंच्या ‘नीलम कंट्रीसाइड’चा पाहुणचार झोडून संध्याकाळी सावंतवाडीत संपूर्ण यात्रेची सांगता झाली.

कोकणातील प्रश्नांची चर्चा नाही

ही यात्रा संपत असली तरी शेतकऱ्यांसाठी आमचा लढा पुढेही चालू राहणार आहे, असं या नेत्यांनी दोन दिवसांच्या या कोकण दौऱ्यात जागोजागी सांगितलं. पण शब्दांचे बुडबुडे वगळता त्याला फारसं वजन मिळू शकलं नाही. कारण राज्यातील शेतकऱ्यांची सर्वसाधारण हलाखीची परिस्थिती, आत्महत्या, तूरडाळ यासारखे कोकणातील शेतीशी कुठल्याच प्रकारे नातं नसलेले विषय या नेत्यांनी मांडले. नाही म्हणायला आंबा, काजू, भात, मत्स्यशेती, कृषिपर्यटन यासारखे शब्द अधूनमधून पेरले जात होते. पण त्यामध्ये गांभीर्याने विचार कुठेच नव्हता. रत्नागिरी जिल्’ाात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची सारखीच दयनीय परिस्थिती आहे. त्यामुळे येथील मुख्य राजकीय शत्रू असलेल्या शिवसेनेच्या सत्तेतील बोटचेपेपणावर मात्र सर्वानी यथेच्छ तोंडसुख घेतलं. राज्याच्या अन्य विभागांच्या तुलनेत कोकण विभागाचे शेतीविषयक प्रश्न अतिशय वेगळे आहेत. त्याबाबत मात्र फारसा ऊहापोह झालाच नाही.  रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यंमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था भुसभुशीत पायावरच्या डोलाऱ्यासारखी झाली आहे. काही वर्षांपूर्वी या दोन्ही जिल्ह्यंमध्ये राष्ट्रवादीने चांगलं बस्तान बसवलं होतं. पण पक्षांतर्गत साठमारीच्या खेळामुळे रत्नागिरी जिल्ह्यत दोन आमदार असूनही संघटनात्मक अस्तित्व नाममात्रच अहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यत राणेंभोवती विरोधी पक्षाचं राजकरण केंद्रित झालेलं. पण सध्या त्यांची अवस्था भाजप घेत नाही म्हणून काँग्रेसमध्ये, अशी असल्यासारखी कार्यकर्त्यांनाच वाटू लागली आहे. त्यामुळेच की काय, या यात्रेतही त्यांचा सहभाग शेवटपर्यंत अनिश्चित होता. आपल्या आग्रहावरून ते इथे आले, असं तटकरेंनी सावडर्य़ाच्या मेळाव्यात सांगत त्यांची आणखीच गोची केली.

दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांच्या अशा शोचनीय परिस्थितीमुळे या दोन जिल्ह्यंमधून आंबा-काजू उत्पादक किंवा मच्छीमारांचं एकही शिष्टमंडळ या नेत्यांना आपल्या समस्या घेऊन भेटलं नाही आणि यांनीही त्यांच्यापर्यंत जाण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे विदर्भ-मराठवाडय़ाच्या सामाजिक-नैसर्गिक दाहकतेच्या पाश्र्वभूमीवर कोकण पर्यटनाने संघर्ष यात्रेचा सुखान्त झाला, असेच म्हणावे लागेल.

First Published on May 20, 2017 2:52 am

Web Title: maharashtra sangharsh yatra in konkan