News Flash

मराठी माध्यमातील भुगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेचा वापर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी मराठी माध्यमातील सहावी इयत्तेच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार सभागृहात निदर्शनास आणून दिला. 

मराठी माध्यमातील सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार समोर आला असून यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या मुद्द्यावरुन गोंधळ घातल्याने विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले.

शुक्रवारी विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यावर मराठी भाषा समितीचा पहिला अहवाल सादर केला जाणार होता. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी मराठी माध्यमातील सहावी इयत्तेच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार सभागृहात निदर्शनास आणून दिला.

राज्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या मार्फत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक दिले जाते. रायगड जिल्ह्यातील म्हसळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेतही हीच पुस्तकं विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यातील सहावी इयत्तेतील भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचे तटकरे यांनी सांगितले. पाठ्यपुस्तकातील काही पानांवर गुजराती भाषेचा वापर केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावरुन शिक्षण विभागातील गलथान कारभार समोर येतो. तसेच या पुस्तकांची छपाई अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी  येथे झाली. हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

तटकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, महाराष्ट्राचे गुजरातीकरण सुरु आहे, असा आरोप आमदारांनी केला. या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले. कामकाज सुरु झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी याच मुद्द्यावरुन घोषणाबाजी सुरु केली. अखेर पुन्हा एकदा कामकाज तहकूब करावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 2:50 pm

Web Title: maharashtra school marathi medium sixth standard geography book gujarati language
Next Stories
1 VIDEO: चले जाव चळवळ कोणी सुरु केली, ऐका काय म्हणतात अजित पवार
2 नाणार प्रकल्प नाही लादणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3 कोल्हापुरात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, पत्रा कापून जखमींना काढलं बाहेर
Just Now!
X