गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यावरून संभ्रम निर्माण झाला असून, भाजपाने याचं मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत “महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?,” असं ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

मुंबई व ठाण्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. त्यामुळे शाळा सुरू उघडण्याच्या निर्णयावरून गोंधळ निर्माण झाला होता. त्यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सविस्तर माहिती देत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं होतं. याच मुद्यावर आशिष शेलार यांनी बोट ठेवत काही प्रश्न सरकारला विचारले आहेत.

“शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच..पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. भयभीत आहेत,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

“परीक्षा घेण्यावरुन संभ्रम. परीक्षा घेतल्या त्यात पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप. अॅडमिशवरुन गोंधळ. फी वाढीबाबत हतबलता. अभ्यासक्रमाबाबत ही प्रश्नचिन्ह. शाळा सुरू करण्यात तर सावळागोंधळ. महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी?,” असा सवाल शेलार यांनी सरकारला केला आहे.

राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने शुक्रवारी मागे घेतला आणि शाळा सुरू करण्याच्या जबाबदारीचे ओझे स्थानिक प्रशासनांवर टाकले. त्यानुसार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील प्रशासनांनी ३१ डिसेंबपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.