रविवारी महाराष्ट्रात एकूण ५६ हजार ६४७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर ६६९ रुग्ण दगावले. शनिवारच्या तुलनेत रविवारी हा आकडा घटल्याचं दिसून आलं आहे. शनिवारी राज्यात ६३ हजार २८२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

महाराष्ट्रातला रुग्णांचा एकूण आकडा आता ४७.२२ लाखांपर्यंत पोहोचला आहे तर राज्यातला मृत्युदर आता १.४९ टक्के नोंदवण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात राज्यात सर्वाधिक म्हणजे ४,६२१ रुग्णांची नोंद पुण्यात झाली तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला. तसंच पिंपरी चिंचवडमध्ये ४,१९४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला.

त्याचबरोबर सातारा आणि सोलापूरसहित पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे १५ हजार ७७६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर रविवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३९.८१ लाखांवर पोहोचली. शनिवारी हीच संख्या ३९.३० लाख होती.

मुंबईमध्ये रविवारी ३,६७२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ७९ मृत्युंची नोंद झाली. तर शहरात रविवारी २८,६३६ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांपेक्षा रविवारच्या चाचण्यांची संख्या साधारण ९०००ने कमी आहे. मात्र, तरीही लागण झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे. त्यामुळे दिवसाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचा दर १३ टक्क्यांच्या आसपास गेला आहे.

शुक्रवारी मुंबईतला रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचा दर गेल्या दीड महिन्यात पहिल्यांदाच १० टक्क्यांच्या खाली गेला होता.

विकेंड असल्याने नेहमीपेक्षा कमी चाचण्या करण्यात आल्या. मात्र रुग्ण बरे होण्याचा दर वाढणे हे विषाणू प्रसाराचा वेग कमी होण्याचं लक्षण असल्याची माहिती महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.