News Flash

७२ वर्षीय व्यक्तीला पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा तर दुसरा ‘कोव्हिशिल्ड’चा; राजेश टोपेंच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

दुसरी लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसू लागल्यावर झाला खुलासा

एकीकडे देशामध्ये करोना लसींचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये लसीकरणासंदर्भातील एक मोठा बेजबाबदारपणा उघडकीस आळा आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यामध्ये एका वयस्कर व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आले आहेत. या व्यक्तीला पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा देण्यात आला होता. तर दुसरा डोस ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा देण्यात आला आहे. दुसऱ्या डोसनंतर या व्यक्तीला त्रास होत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टर या व्यक्तीच्या आरोग्यावर लक्ष ठेऊन आहेत.

जालना तील खांडवी गावात राहणाऱ्या ७२ वर्षीय दत्तात्रय वाघमारे यांना २२ मार्च रोजी परतूर येथील एका ग्रामीण रुग्णालयामध्ये ‘कोव्हॅक्सिन’चा डोस देण्यात आला होता. त्यानंतर लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना ३० एप्रिल रोजी बोलवण्यात आलेले. दुसऱ्या डोससाठी दत्तात्रय गेले तेव्हा त्यांना सृष्टी गावातील आरोग्यकेंद्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला.

वाघमारे यांचा मुलगा दिंगबर याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार दुसरा डोस घेतल्यानंतर दत्तात्रय यांना ताप आला होता आणि त्यांची त्वचा कोरडी पडली होती. लसीचे साईड इफेक्ट जाणवू लागल्यानंतर दत्तात्रय यांना दिंगबरने परतूर येथील आरोग्य केंद्रामध्ये नेलं. तिथे त्यांना काही औषध देण्यात आली. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी लसीकरणासंदर्भातील माहिती असणारी कागदपत्रं दुसऱ्या दिवशी तपासली असता दत्तात्रय यांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आल्याचं उघड झालं.

कागदपत्रं आणि कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनंतर डॉक्टरांची एक टीम दत्तात्रय यांची तपासणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचली. काही वर्षांपूर्वीच दत्तात्रय यांच्या हृदयावर शस्त्रक्रीया झाल्याची माहिती डॉक्टरांना देण्यात आली. दत्तात्रय यांची बायपास सर्जरी झाल्याचं मुलाने सांगितलं. माझे आई वडील अशिक्षित आहेत. त्यामुळेच त्यांना लसीचा कोणता डोस देत आहेत यासंदर्भातील माहिती घेतली नाही. घडलेला प्रकार हा लसीकरण केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणातून घडाल आहे. आधी कोणती लस देण्यात आली आहे त्याची तपासणी न करताच दुसरी लस वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिल्याचं दिगंबर यांनी म्हटलं आहे. या प्रकऱणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं औरंगाबाद विभागाचे आरोग्य उपनिर्देशक स्वप्निल लाले यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 11:55 am

Web Title: maharashtra senior citizen given different vaccines in jalna under watch scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जयंत पाटलांच्या नाराजीनंतर ठाकरे सरकारमध्ये फूट?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान
2 “…याआधी देशात असं कधीच झालं नव्हतं,” संजय राऊतांनी मोदी सरकारला सुनावलं
3 धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत? करुणा मुंडे उलगडणार प्रेमकथा; फेसबुक पोस्टमुळे खळबळ
Just Now!
X