नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा जोरात असतानाच शिवसेनेनेही भाजपला हादरा देण्याची तयारी सुरु केली आहे. सोमवारी शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाली. सरकारचे काय करायचे असा प्रश्न सध्या आहे. पण शिवसेना निर्णयाच्या जवळ आली असून, आणखी काही काळ प्रतीक्षा करा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत शिवसेनेने भाजपला अल्टिमेटमच दिला आहे.

सोमवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्री, आमदार आणि खासदार यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी उद्धव ठाकरेंसमोर नाराजीचा पाढा वाचला. सत्तेत असूनही विकास कामे होत नसल्याची तक्रार आमदार- खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे केल्याचे समजते. सरकारबाबत काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी आमदारांना विचारला होता, असे वृत्त मराठी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. यावर उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा, आमचा पाठिंबा असेल असे आमदारांनी सांगितल्याचे समजते.

बैठकीनंतर संजय राऊत यांनी ट्विटरवर एक ट्विट केले आहे. यामध्ये राऊत म्हणाले, ‘सरकारचे काय करायचे?, होय, शिवसेना निर्णयाच्या जवळ आली आहे. थांबा आणि प्रतीक्षा करा’. तर रामदास कदम यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेची महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य वेळेला घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

नारायण राणे हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांनी रविवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी नारायण राणे कुडाळमध्ये सभा घेणार असून या सभेत राणे काय बोलणार याची उत्सुकता आहे. या घडामोडी सुरु असतानाच आता शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिल्याने राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लढवले जात आहेत.