News Flash

पुढील वर्षांपासून दहावीतील गुणांची खैरात बंद

अंतर्गत मूल्यमापन पद्धती थांबवण्याचा निर्णय

अंतर्गत मूल्यमापन पद्धती थांबवण्याचा निर्णय

अंतर्गत मूल्यमापन पद्धतीचा दहावीच्या परीक्षेत अवलंब केल्यापासून निकालात भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र, अंतर्गत मूल्यमापनाचे यंदाचे शेवटचे वर्ष असून, पुढील वर्षी गणित आणि विज्ञान वगळता सर्व विषयांची परीक्षा १०० गुणांची होणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांवर गुणांची होणारी खैरात पुढील वर्षीपासून बंद केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये निकालांचे आकडे ९० टक्क्य़ांच्या जवळपास किंवा त्याहून अधिक आहेत. त्यात अंतर्गत मूल्यमापन पद्धतीचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनामध्ये जवळपास सर्वच शाळा पैकीच्या पैकी गुण देतात. शाळांनाही आपले निकाल वाढवायचे असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे असते. शाळांकडून केल्या जाणाऱ्या सढळ गुणदानामुळे अलीकडे निकालाचे आकडे ‘वाढता वाढता वाढे’ झाले होते. अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा खऱ्या अर्थाने कस लागतच नाही. अंतर्गत मूल्यमापन आणि कला-क्रीडा नैपुण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गतवर्षी १९३ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी, म्हणजे १०० टक्के गुण मिळाले होते. तर यंदा १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. मात्र, पुढील वर्षीपासून या सढळ गुणदानास चाप लावला जाणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षांत दहावीचा अभ्यासक्रम बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धतीही बदलणार आहे. एकूण ६०० गुणांची परीक्षा होईल. प्रत्येक विषयाची परीक्षा १०० गुणांची असेल. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांला प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवावे लागतील. मात्र, सर्वोत्तम पाच विषयांचे गुण ग्राह्य़ धरण्याची (बेस्ट ऑफ फाईव्ह) पद्धत कायम राहणार आहे. अंतर्गत मूल्यमापन पद्धत थांबवण्याचा निर्णय या पूर्वीच घेण्यात आला आहे. बालभारतीने मूल्यमापनाच्या आराखडय़ाची पुस्तिकाही प्रसिद्ध  केली आहे. त्यामुळे पुढील वर्षीपासून १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. केवळ  विज्ञानासाठीच प्रात्यक्षिक परीक्षा असेल. त्यामुळे इतर विषयांना अंतर्गत मूल्यमापनातून मिळणारे २० गुण बंद होणार आहेत. सामाजिक शास्त्राची शंभर गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये ६० गुण हे इतिहास, राज्यशास्त्र यांच्यासाठी आणि ४० गुण हे भूगोलासाठी अशी विभागणी करण्यात आली आहे. भाषेप्रमाणेच सर्व विषयांसाठीही कृतिपत्रिका म्हणजेच पुस्तकातील पाठांपेक्षा विषयाच्या वापरावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना भवतालाचे आकलन उत्तरामध्ये मांडावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता पणाला लागणार आहे.

दहावीच्या परीक्षेमध्ये अंतर्गत मूल्यमापन पद्धत कायम ठेवायची की नाही, याबाबतचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) अखत्यारित आहे. त्याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढण्यात येईल. अद्याप त्या बाबतची काही माहिती नाही.   – डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:15 am

Web Title: maharashtra ssc 10th result 2018
Next Stories
1 Maharashtra SSC Result 2018 : १२५ विद्यार्थी आणि ४०२८ शाळा १००%
2 मृग नक्षत्री आनंदघन अंगणी!
3 Maharashtra SSC 10th Result 2018: नर्स होण्यासाठी आठ वर्षानंतर दिली दहावीची परीक्षा; पुण्यातील रात्रशाळेत आली पहिली
Just Now!
X