कृष्णा पांचाळ,पिंपरी-चिंचवड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरीबी आणि खडतर परिस्थितीवर मात करत लातूर जिल्ह्यातील संतोषी पालके या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९१.४० टक्के गुण मिळवत शाळेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. संतोषीने शाळा सुटल्यानंतर ६ रुपये किलोने चिंचा फोडल्या आणि सुट्टीच्या दिवशी शेतात काम करून परीक्षा शुल्क आणि पुस्तकांसाठी पैसे जमवले होते. अथक परिश्रम करत हे यश मिळवणाऱ्या संतोषीने कौतुक करावे तितके कमीच आहे.

संतोषी पालकेला आई- वडील नाहीत. पंधरा वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे तिच्या वडिलांचे अपघातात निधन झाले. तर पाच वर्षांपूर्वी गंभीर आजाराने आईला हिरावून घेतले. मात्र हे सर्व दुःख विसरून त्यावर मात करून संतोषीने शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. संतोषी सध्या तिच्या लहान भावासोबत आजीच्या घरी राहते. संतोषी बिभीषण पालके ही लातूर जिल्ह्यातील खलंग्री गावची असून संतोषीने सर्वोदय विद्यालयात शिक्षण घेतले.

संतोषीचा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ गणेश हा एका खासगी कंपनीत काम करतो. पण त्याला जेमतेम सहा हजार रुपये पगार. संतोषीच्या शिक्षणासाठी खर्च कसा करायचा, हा प्रश्न होताच. पण शेवटी संतोषीने यावर तोडगा काढला. संतोषी सकाळी १० ते ४ या वेळेत शाळेत जायची आणि उरलेल्या वेळेत ६ रुपये किलोने चिंचा फोडायला जायची. कधी ५ तर कधी ६ रुपये प्रति किलो या दराने चिंचा फोडायची. यातून तिला दिवसाला ३० ते ४० रुपये मिळायचे. यामुळे शिक्षणावरील खर्चात हातभार लागायचा. पण हे पैसे कमी पडायचे. मग संतोषी तिच्या आजीसोबत शेतात मजुरीसाठी जायची.

सुट्टीच्या दिवशी संतोषी शेतात काम करुन ३०० रुपये कमवायची. हे सर्व पैसे साठवून तिने परीक्षा शुल्क आणि पुस्तकांचा खर्च भागवला. अखेर या कष्टाचे फळ तिला मिळाले असून दहावीच्या परीक्षेत संतोषीला ९१.४० टक्के गुण मिळाले आहेत. भविष्यात डॉक्टर होण्याची संतोषीची इच्छा आहे. गावात तिच्या या कामगिरीचे कौतुक होत असून स्वतःच्या जिद्दीवर तिने यशाची पहिली पायरी सर केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ssc 10th result 2018 latur girl scored 91 percent in exam
First published on: 09-06-2018 at 15:08 IST