Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018: मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ जून) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा राज्य मंडळाकडून गुरुवारी करण्यात आली. राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली.

समाजमाध्यमांतून निकालाच्या नवनव्या तारखा फिरत होत्या. त्यातून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, राज्य मंडळाने दोन वेळा पत्रक काढून समाजमाध्यमांतील तारखांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. गेल्या वर्षी १४ जूनला निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यापूर्वी २०१६ मध्ये ९ जून, तर २०१५ मध्ये ८ जूनलाच निकाल जाहीर झाला होता. या पाश्र्वभूमीवर, यंदा तुलनेत लवकरच निकाल जाहीर होत आहे.

ऑनलाइन निकाल दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना पाहता येईल. निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून (९ जून) विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करता येईल.

त्यासाठीच्या अर्जाचा नमुना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. राज्यभरातून सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

निकालासाठीची संकेतस्थळे

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com

www.hscresult.mkcl.org

मोबाइलवर निकाल पाहण्यासाठी बीएसएनएल मोबाइलधारकांना ५७७६६ या क्रमांकावर MHSSC<seat no> असा लघुसंदेश पाठवून निकाल पाहता येईल.