दहावीत यंदाही गुणफुगवटा; प्रवेशाची वाट अवघड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदाही गुणवाढ झाली. राज्याचा निकाल ८९.४१ टक्के लागला असून, दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा विषयाचे गुण वाटण्यात आल्याचे निकालातून स्पष्ट झाले. त्यामुळे राज्यभरातील १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. त्याचबरोबर चार हजारांहून अधिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. गेल्या दशकभरामध्ये शाळांचे शंभर टक्के निकाल लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. बारावीच्या निकालात घट झाल्याने दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्याचा निकाल ०.६७ टक्क्यांनी वाढला. कोकण विभागाने अव्वल स्थान राखले, तर  यंदाही निकालात मुलींनी आघाडी घेतली. मागील वर्षी विशेष गुणांची खैरात झाल्याने १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते. १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांबाबत  चर्चाही झाली होती. मात्र, यंदा या संख्येत घट झाली.

गैरप्रकार अधिक..

दहावीची परीक्षा गैरप्रकारांमुळेही चर्चेत होती. मुंबईत १२-१३ जणांना गैरप्रकाराबाबत ताब्यात घेण्यात आले. राज्यभरात  ६६१ गैरप्रकारांची नोंद झाली. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा वाढली आहे. गेल्या वर्षी ५५२ गैरप्रकार नोंदवण्यात आले होते.

कलचाचणी

शिक्षण विभागाकडून राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली. या कलचाचणीतील निष्कर्ष विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसह दिले जाणार आहेत. तात्पुरता कलअहवाल विद्यार्थ्यांना www.mahacareermitra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुनर्परीक्षा १७ जुलैपासून

अनुत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणीसुधारणेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी १७ जुलैपासून पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्यमंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली. पुनर्परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. जुलैमधील निकालानंतर विद्यार्थ्यांना याच वर्षी अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.

  • गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – ९ ते १८ जून
  • उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करण्याची मुदत – ९ ते २८ जून
  • उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी छायाप्रत घेणे आवश्यक. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे.

टक्केवारी वाढली

यंदा राज्यातील टक्केवारीतही वाढ झाल्याचे या निकालात स्पष्ट झाले. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ हजारांनी वाढली आहे. तसेच ७५ ते ८९ टक्क्यांदरम्यानचे गुण मिळवणारे विद्यार्थी यंदा लाखभरांनी अधिक आहेत. त्याशिवाय एकटीकेटीमुळे पुढच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीपेक्षा वाढली आहे. ६० ते ७४ टक्के, ४५ ते ५९ टक्के आणि ३४ ते ४४ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिसंख्येत मात्र घट झाली आहे.

निकालातील खास

  • राज्याच्या निकालात ०.६७ टक्के वाढ
  • ३ हजार ८४९ खेळाडूंना विशेष गुणांचा लाभ
  • १ लाख ६६ हजार २३१ कलाकारांना विशेष गुणांचा लाभ
  • विशेष गुणांचा लाभ मिळाल्याने १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
  • राज्यात कोकण विभाग अव्वल (९६ टक्के)
  • राज्यात नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८५.९७ टक्के)
  • मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४.७० टक्क्य़ांनी अधिक आहे. उत्तीर्ण मुलांचे प्रमाण ८७.२७ टक्के आणि उत्तीर्ण मुलींचे प्रमाण ९१.९८ टक्के.
  • ५७ विषयांपैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के. त्यात पर्यायी भाषांचा समावेश.
  • १०० टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी (७०) लातूर विभागातील.
  • कला, खेळांसाठी गुणवर्षांव
  • पुढील वर्षीपासून दहावीतील गुणांची खैरात बंद; अंतर्गत मूल्यमापन पद्धती थांबवण्याचा निर्णय

५५८७०२ विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र

कोणत्याही दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सुविधा मिळते. हे विद्यार्थीही अकरावी प्रवेशासाठी पात्र असतात. या वर्षी १ लाख ८ हजार ४९९ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी १५ लाख ५८ हजार ७०२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

शंभर टक्के निकाल देणाऱ्या शाळा वाढल्या

राज्यातील २१ हजार ९५७ शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ हजार २८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. गेल्या वर्षी ३ हजार ६७६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. त्यामुळे यंदा शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या वाढली. शंभर टक्के निकाल लागलेल्या सर्वाधिक शाळा मुंबई विभागातील आहेत. ३३ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये लातूर विभाग आघाडीवर आहे.