महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा कोकण विभागीय मंडळाने ९६ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

या विभागाच्या  स्थापनेपासून राज्यात सलग प्रथम येण्याची परंपरा मंडाळाने यावर्षीदेखील कायम राखली असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या परीक्षेसाठी कोकण विभागातून एकूण ३७ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापकी  ३६ हजार १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यतील ११ हजार ५०३ मुले आणि ११ हजार ९३९मुली उत्तीर्ण झाल्या असून एकूण उत्तीर्ण टक्केवारी ९५.९१ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६१५७ मुले, तर ५ हजार ५७२ मुली उत्तीर्ण झाल्या असून, या जिल्ह्याची उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.०४ एवढी आहे.

या परीक्षेसाठी दोन्ही जिल्ह्यातून मिळून १९ हजार ५७४ मुले, तर १८ हजार १०५ मुली  परीक्षेला बसल्या  होत्या. मुलांची उत्तीर्ण संख्या 18 हजार ६६० असून, त्याची टक्केवारी ९५.३३ एवढी आहे. मुलींची उत्तीर्ण संख्या १७ हजार ५११ असून, त्याची टक्केवारी ९६.७२ एवढी आहे. म्हणजेच मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत १.३९ एवढे जास्त आहे.

यंदाच्या निकालातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या विभागातील तब्बल २४९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

या विभागात रत्नागिरी जिल्ह्यत ४०१ आणि सिंधुदुर्गात२२६ अशा ६२७ शाळा असून, या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यात  ७२ आणि सिंधुदुर्गात ४१ अशी एकूण  ११३ परीक्षा केंद्रे होती.

प्रमुख विषयांचा निकाल  पुढीलप्रमाणे – मराठी ९७ इंग्रजी ९९.२७, हिंदी ९७.०२, गणित ९५.९६, विज्ञान ९७.९२ आणि इतिहास भूगोल ९८.४१ टक्के. विशेष म्हणजे यंदा एकही निकाल राखीव नाही. परीक्षेच्या नियोजनाबाबत गिरी यांनी सांगितले की,  दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना नजीकचे केंद्र मिळावे या उद्देशाने सिंधुदुर्गमध्ये मुठाद आणि रत्नागिरीत वरवडे येथे नवी परीक्षा केंद्रे स्थापित करण्यात आली होती. सर्व विषयांच्या मुख्य नियमकांची एकत्रित सभा प्रथमच कोकण विभागीय मंडळात घेऊन मूल्यमापनाचे काम योग्य व बिनचूक होण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या.

दहावी परिक्षेत कमाल २ विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठी एटीकेटी सुविधा लागू आहे. अशा विद्यार्थ्यांना अकरावीत तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देण्यात येईल. एटीकेटी मिळालेले विषय जुल-ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेत सोडवता येतील. यामध्ये पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास मार्च २०१९ किंवा त्यापुढील परिक्षेत प्रविष्ठ होता येईल. मात्र, त्यांचा अकरावीचा निकाल दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच जाहीर करण्यात येणार असल्याचे गिरी यांनी स्पष्ट केले.

रायगडचा दहावीचा निकाल ८९.३७ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळातर्फे मार्च २०१८  मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रायगड  जिल्ह्यचा निकाल ८९.३७ टक्के लागला. सालाबाद प्रमाणेही यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. ८७.४७ टक्के मुलं तर ९१.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तालुका निहाय निकालाच्या टक्केवारीत पनवेल तालुका अव्वल ठरला. रायगड जिल्ह्यत  दहावीच्या परीक्षेसाठी ३६ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली होती. ३६ हजार ४३५  विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापकी ३२ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रायगडचा एकुण निकाल ८९.३७ टक्के लागला.  ७ हजार १२२  विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. ११ हजार २९२ विद्यर्थ्यांना प्रथमवर्ग मिळाला. १० हजार ९१७  विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर ३ हजार २३० विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.

सालाबाद प्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. मुलांच्या तुलनेत मुली पास होण्याचे प्रमाण अधिक राहिले. ९१.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर ८७.४७ टक्के मुले उत्तीर्ण झाली.  १९ हजार १९ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १९ हजार २४९ मुलं परीक्षेला बसली होती त्यातील १६ हजार ८३७ उत्तीर्ण झाली. तर १७ हजार २३० मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १७ हजार १८६ मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापकी १५ हजार ७२४ मुली उत्तीर्ण झाल्या. रायगड जिल्ह्यतील पनवेल  तालुक्याचा सर्वाधिक ९२.४८  टक्के तर श्रीवर्धन  तालुक्याचा सर्वात कमी ८२.७१ टक्के निकाल लागला.

तालुकानिहाय निकाल- पनवेल ९२.४८  टक्के, उरण- ८८.३२  कर्जत ८४.९९   खालापूर- ८६.८०, सुधागड- ८४.५१  पेण -९०.७२  अलिबाग- ८७.७६ मुरुड- ८९.२६   रोहा- ९०.०७ माणगाव- ९१.३०  तळा -८२.९९  श्रीवर्धन ८२.७३  म्हसळा -८९.६  महाड- ८९.४  पोलापूर ८९.८०