फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; २३.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २३.६६ टक्के लागला. हा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा बारावीच्या फेरपरीक्षेप्रमाणेच दहावीच्या निकालातही घसरण झाली.
राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी निकालाविषयी माहिती दिली. मार्चमध्ये झालेल्या नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यासाठी आणि श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी १७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेण्यात आली.
राज्यातील मंडळाच्या पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, लातूर, कोकण, औरंगाबाद आणि कोल्हापूर या नऊ मंडळांअंतर्गत परीक्षेसाठी अर्ज केलेल्या १ लाख २२ हजार १७ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २१ हजार ५९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी २८ हजार ६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फेरपरीक्षेत अमरावती विभागाचा निकाल सर्वाधिक ३१.७७ टक्के लागला.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दहावीच्या फेरपरीक्षेच्या एकूण निकालात घसरण झाली. २०१६ मध्ये २७.९७ टक्के आणि २०१७ मध्ये २४.४४ टक्के निकाल लागला होता.
एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीसाठी पात्र
फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ५५४ विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाले असून, हे विद्यार्थी एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. तसेच फेरपरीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत.
कौशल्य विकासासाठी पात्र
- फेरपरीक्षेतील तीन किंवा त्याहून अधिक विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थी राज्य सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमासाठी पात्र ठरतात.
- २०१६-१७ पासून राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला.
- यंदा २९ हजार ९२६ विद्यार्थी या उपक्रमासाठी पात्र ठरले आहेत.
महत्त्वाच्या तारखा
- गुणपडताळणी – ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर
- उत्तरपत्रिकांची छायाप्रत – ३० ऑगस्ट ते १८ सप्टेंबर
- पुनर्मूल्यांकन – छायाप्रत अनिवार्य. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच कार्यालयीन दिवसांत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 1:52 am