राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी संप सुरु असून बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात आंदोलनादरम्यान एसटी कंडक्टरचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. एकनाथ वाकचौरे (वय ५२ वर्षे) असे या कंडक्टरचे नाव असून ते अकोले डेपोत कार्यरत होते.

सातवा वेतन आयोग लागू करा आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसहित अन्य पाच संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाची हाक दिली. बुधवारी संपाचा दुसरा दिवस असून हे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे. बुधवारी अकोले डेपोत एसटी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु होते. या आंदोलनात एसटी कंडक्टर एकनाथ वाकचौरे हेदेखील सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान वाकचौरे यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. वाकचौरे हे मूळचे संगमनेरचे निवासी असल्याचे समजते. आंदोलनादरम्यान वाकचौरे यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाकचौरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच अकोले डेपोतील कर्मचारी रुग्णालयाच्या आवारात जमले.

दरम्यान, संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रसारमाध्यमांवरच आगपाखड केली. एसटी संपाबाबत प्रश्न विचारताच रावते यांचा पारा चढला, असे वृत्त आहे. मी एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करत असून कर्मचारी संघटनांनी संप मागे घेऊन प्रवाशांना दिवाळीत दिलासा द्यावा, असे आवाहन रावते यांनी केले.

राज्य सरकारने महामंडळास लोकोपयोगी सेवा घोषित केले असून संप केल्यास आणि त्यात सहभागी झाल्यास एक महिना तुरुंगवास किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशारा राज्य सरकारने दिला होता. मात्र, यानंतरही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही.