महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र करोनाच्या काळात गणेशोत्सव साजरा करण्याला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काही निर्देश घालून दिले आहेत. ज्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची जास्तीत जास्त उंची ही चार फूट तर घरगुती गणपतीची जास्तीच जास्त उंची दोन फूट असावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाकरे सरकारने हे निर्देश दिले आहेत.

ठाकरे सरकारने काय निर्देश दिले आहेत?
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे.

कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश यांचे पालन करावे.

सार्वजनिक गणेशत्सोवातील गणपतीची मूर्ती जास्तीत जास्त चार फूट उंचीची असावी. घरगुती गणपतीच्या मूर्तीची उंची जास्तीत जास्त दोन फूट असावी

यावर्षी पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर यांच्या मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडू किंवा पर्यावरणपूरक असेल तर शक्यतो घराच्या घरीच मूर्तीचं विसर्जन करावं. जर गणेशमूर्तीचं विसर्जन पुढील वर्षी शक्य असेल तर पुढील वर्षी करावे

उत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिली गेल्यास त्याचा स्वीकार करावा, जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही हे पहावे. आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावं

सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम अर्थात रक्तदान शिबिरं, यास प्राधान्य द्यावं.

करोना, मलेरिया, डेंग्यू या आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय योजावेत आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करावी

असे सगळे निर्देश ठाकरे सरकारने दिले आहेत. यानुसारच गणेशोत्सव साजरा करावा असं स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या गृहखात्याने हे निर्देश लागू केले आहेत.