राज्यातील पोलीस यंत्रणेने लाचखोरीतील आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले असून गेल्या चार महिन्यात ९६ प्रकरणांमध्ये १२२ लाचखोर पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत. विविध विभागांमधील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या काळात सुमारे १ कोटी रुपयांची लाच मागितली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताज्या अहवालनुसार राज्यात गेल्या १ जानेवारीपासून १० मेपर्यंत लाच स्वीकारण्याच्या प्रकरणांमध्ये ३९४ सापळे लावण्यात आले होते. त्यात ४९६ अधिकारी आणि कर्मचारी अडकले. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड, असे आठ विभाग आहेत. विविध सरकारी विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबी शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करते. राज्यात गेल्या पाच वर्षांत लाचखोरीची ४ हजार ९२० प्रकरणे आढळून आली आहेत. पोलीस दलात लाच मागण्याविषयीच्या सर्वाधिक तक्रारी गेल्या साडे महिन्यात आल्या आहेत. पोलिसांनी या काळात १२ लाख ८८ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याखालोखाल महसूल विभागाचा क्रमांक लागतो. महसूल विभागातील ११५ अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात सापडले आहेत. एकूण ९२ प्रकरणांमध्ये लाचेची रक्कम ८ लाख ५० हजार होती. महापालिका आणि जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही लाचखोरवृत्ती वाढीस लागली असून महसूल विभागानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांशी सर्वसामान्यांचा संबंध येतो. लहानसहान कामांसाठी अडवणूक करून लाच मागणारे अधिकारी आणि कर्मचारी उजळमाथ्याने वावरतात. लाचेची रक्कम तुलनेने कमी असली, तरी दैनंदिन कामासाठी येणारे लोक या व्यवस्थेत भरडले जातात. आता या कर्मचाऱ्यांच्या विरोधातही एसीबीकडे तक्रार करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

गेल्या चार महिन्यात महापालिकांमध्ये लाचेची २० प्रकरणे निदर्शनास आली. यात २५ अधिकारी आणि कर्मचारी अडकले. या लाचखोरांनी ३८ लाख ९५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ती इतर सर्व विभागांपेक्षा सर्वाधिक आहे. महावितरण कंपनीतही १७ प्रकरणांमध्ये २० भ्रष्ट कर्मचारी एसीबीच्या हाती लागले आहेत. या लोकांनी १ लाख ७४ हजार रुपयांची लाच मागितली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागातील केवळ एकाच कर्मचाऱ्याला एसीबीने या काळात पकडले. त्याची लाच फक्त ५ हजार रुपयांची होती. गेल्या वर्षीपेक्षा या चार महिन्यांमध्ये लाचखोरी पकडण्याच्या घटनांमध्ये १० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असली, तरी लाचखोरांची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते मे २०१५ पर्यंत लाचेच्या ४३७ सापळ्यांमध्ये ५६४ लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी अडकले होते. या प्रकरणांमध्ये गेल्या तीन ते वर्षांत तक्रारकर्त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेष म्हणजे, अनुसूचित जमातीतील लोकांमध्ये जागरुकता वाढली असून ४८ जणांनी लाचखोरांना गजाआड करण्यात महत्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत २२ महिला आणि २३ वृद्ध तक्रारकर्ते समोर आले आहेत. तक्रारकर्त्यांमध्ये सर्वाधिक ३६१ जण २६ ते ३५ वयोगटातील आहेत.