महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाटय़ स्पर्धेतील पुरस्कार जाहीर

मुंबई : ‘सोयरे सकळ’ नाटकाला ३१ व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट नाटकाच्या प्रथम पारितोषिकासह दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, नाटय़लेखन, सवरेत्कृष्ट अभिनेत्री अशा विभागांमध्ये ९ पुरस्कार जाहीर  झाले आहेत. या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाटय़प्रयोग सादर करण्यात आले होते.

‘लोकसत्ता संपादक शिफारस प्राप्त’ भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या ‘सोयरे सकळ’ नाटकाने या स्पर्धेत  ७ लाख ५० हजार रुपयांच्या प्रथम पारितोषिकासह दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक, प्रकाश योजनेचे द्वितीय पारितोषिक, नेपथ्याचे द्वितीय पारितोषिक, संगीत दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक, वेशभूषा प्रथम पारितोषिक, रंगभूषा प्रथम पारितोषिक, नाटय़लेखन प्रथम पुरस्कार आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रथम पुरस्कार अशा एकूण ९ पुरस्कार विभागात बाजी मारली.

जिगीषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाला ४ लाख ५० हजारांचे द्वितीय पारितोषिक आणि अद्वैत थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या ‘आरण्यक’ या नाटकाला ३ लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्य व्यावसायिक नाटय़ स्पर्धेत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना ‘हॅम्लेट‘ नाटकासाठी दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नेपथ्य, वेशभूषा आणि प्रकाशयोजना या तीन विभागांमध्ये नेपथ्याचे प्रथम आणि द्वितीय, प्रकाश योजनेचे प्रथम आणि द्वितीय आणि वेशभूषेचे द्वितीय पारितोषिक असे पाच पुरस्कार नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी पटकावले आहेत.

सवरेत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये भरत जाधव (नाटक-वन्स मोअर), प्रशांत दामले (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट), सुमीत राघवन (नाटक-हॅम्लेट), उमेश कामत (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे) आणि सतीश राजवाडे (नाटक-अ परफेक्ट मर्डर) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सवरेत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार  ऐश्वर्या नारकर (नाटक-सोयरे सकळ), तेजश्री प्रधान (नाटक-तिला काही सांगायचय), ऋता दुर्गुळे (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), प्रतिभा मतकरी (नाटक-आरण्यक), माधुरी गवळी (नाटक-एपिक गडबड) या अभिनेत्रींना जाहीर झाले आहेत.

६ मे ते २० मे या कालावधीत दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले आणि प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिर, बोरीवली या ठिकाणी जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाटय़प्रयोग सादर करण्यात आले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, विलास उजवणे, देवेंद्र पेम, अमिता खोपकर आणि शीतल क्षीरसागर यांनी काम पाहिले.