अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजुर कष्टकऱ्यांचा मोर्चा रविवारी मुंबईत दाखल झाला आहे. सोमवारी शासनाशी चर्चा केल्यानंतर हे शेतकरी आपापल्या गावी परतणार आहेत. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप परतता यावे म्हणून एस.टी. महामंडळाने खास गाड्यांची सोय केली आहे.
शेतमालास दीडपट हमीभाव द्यावा, कृषीपंपाचे वीजबील माफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफरशींची अंमलबजावणी करावी, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करावी आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी ६ मार्चला चालत निघालेला हजारो शेतकºयांचा मोर्चा रविवारी रात्रीच आझाद मैदान येथे पोहचला आहे. त्यांचा परतीचा प्रवास सुकर व्हावा म्हणून एस.टी.ने विविध मार्गांवर खास गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई नाशिक मार्गाने जाण्यासाठी पैसे अधिक लागतात. त्यामुळे बरेच जण सीएसटी ते कसारा रेल्वेचा पर्याय निवडतात आणि तेथून कसरा – नाशिक किंवा शहपूर – नाशिक या मार्गावरून पुढील प्रवास करतील असा अंदाज ठाणे एस.टी. आगराचे अधिकारी आर. एच. बांदल यांनी सांगितले. नेहमीच्या वेळापत्रकानुसार कसारा ते नाशिक दरम्यान एकुण ४५ गाड्या सोडल्या जातात. शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन आणखी ४५ गाड्यांची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी खास चालक, वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे.
मागणीनुसार गाड्या सोडणार
कसारा ते नाशिक किंवा शहापूर ते नाशिक अशी सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्या शेतकºयांना गावात जायचे असल्यास त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. ठाणे खोपट आगरातूनही अधिक गाड्यांची सोय करण्यात आली आहे. एका गावातील ४४ शेतकरी धुळे किंवा सांगली या ठिकाणी जाणारे असतील तर त्यांच्या मागणीनुसार गाड्या सोडण्यात येणार आहेत. सोमवार तसेच मंगळवार ही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 4:51 pm