नारायण राणे यांना सत्ता काळात कणकवली ग्रामपंचायत आणि नंतर नगर पंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमताने सत्ता मिळाली नव्हती, तेवढी सत्ता नगर पंचायतीत कणकवलीकरांनी दिली. शांतता तेथे समृद्धी असे म्हटले जाते. त्यामुळे जनतेचा कौल शांती व समृद्धीसाठी असल्याचे चर्चिले जात आहे. कणकवली राडा संस्कृतीची ओळख राज्यभर होती. प्रत्येक निवडणुकीत राज्याचे लक्ष वेधले जायचे पण यंदा कणकवली नगर पंचायत निवडणूक शांततेत पार पडली. त्यामुळे शांतता व समृद्धीसाठी मतदारांनी दिलेला कौल सर्वागीण विकासाकडे घेऊन जाणारा ठरेल असे जनतेला वाटते. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर असूनही जिल्ह्य़ातील जनता भाजपला सिंधुदुर्गात स्वीकारत नसल्याचे चित्र यामुळे उभे राहिले आहे. कणकवली नगर पंचायत निवडणुकीत नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाला विरोध करत भाजप-शिवसेना युतीसाठीपण कणकवलीकरांनी भाजपला या ठिकाणी पोपट बनविला. त्याला स्थानिक नेते जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र-राज्यात सत्ता असली तरी शिवसेना-भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील नेत्यात असणाऱ्या कुरबुरींचा फायदा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी योग्य पद्धतीने घेतला. आमदार नितेश राणे यांनी सारे जुळवून आणून शक्य ते सर्व पर्याय निवडत नगराध्यक्षपदासह १२ नगरसेवक विजयी केले. त्यामुळे आमदार नितेश राणे किंगमेकर ठरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भाजप-शिवसेना युतीमधील अंतर्गत वाद आहेत. त्याहीपेक्षा दोन्ही पक्षात नेत्यांची संख्या वाढल्याने अंतर्गत कुरबुरी आहेत. नारायण राणे संधीचा फायदा करून घेण्यात कायमच पुढाकार घेतात. कणकवली नगर पंचायतीत राष्ट्रवादीला एक जागा सोडत स्वाभिमान व राष्ट्रवादीची आघाडी केली. पिंगुळी पंचायत समिती पोटनिवडणुकीत स्वाभिमान व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडी करून स्वाभिमानजिंकला आहे. राजकारणातील पोकळी शोधत नारायण राणे यांनी निवडणुकाजिंकण्याचे तंत्र प्रत्यक्षात स्वीकारले. पण भाजप- शिवसेनेच्या कणकवलीतील अंतर्गत कुरबुरी, पोपटासारखी भाषणे, पत्रकार परिषदा स्वाभिमान जागविणाऱ्या ठरल्या. तसेच भाजप-शिवसेनेची नगरसेवकपदाच्या चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत स्वाभिमानच्या फायद्याची ठरली.

कणकवली ग्रामपंचायत व नगर पंचायतीत संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली बराच काळ सत्ता भोगली. या सत्ता संघर्षांत संदेश पारकर यांना जनतेने साथही दिली, पण भाजप-शिवसेना एकत्र येऊन देखील स्वाभिमानला कणकवलीकरांनी स्वीकारले. त्यामुळे संदेश पारकर यांच्या पुढील राजकीय वाटचालीला आता अडथळे निर्माण होणार आहेत. कणकवली नगर पंचायतीत स्वाभिमानजिंकल्याने नारायण राणे यांच्या नव्या राजकीय समीकरणांचा उदय होण्याची शक्यता आहे.