महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी छगन भुजबळ यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून वांद्रे येथील ‘एमईटी’मध्ये ही भेट झाल्याचे वृत्त आहे. या भेटीमध्ये काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोन वर्ष तुरुंगात काढल्यानंतर छगन भुजबळ नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची पुरेशी पाठराखण केली नाही व त्यामुळे आगामी काळात ते वेगळ्या पर्यायाचा विचार करु शकतात, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. राणेंनी सध्या भाजपाशी युती केली आहे.

छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणेंनी त्यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधला होता. अखेर गुरुवारी राणे यांनी भुजबळ यांची भेट घेतली. राणे यांनी भुजबळांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, असे राणेंच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मात्र, भुजबळ- राष्ट्रवादीमध्ये दुरावा निर्माण झाला असतानाच ही भेट झाल्याने चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे नारायण राणे आणि छगन भुजबळ हे पूर्वी शिवसेनेतच होते.

पक्षाच्या स्थापनेनंतर खासदार नारायण राणे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण या भागांचे दौरे केले होते. आज नारायण राणे मुंबईत कार्यकर्ता मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन करणार आहेत. पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने छगन भुजबळ आणि राणे एकत्र येणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.