प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्राने यावेळी मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र प्रस्ताव नाकारण्यात आल्याने यावेळी राज्याचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात दिसणार नाही. दरवेळी रोटेशन पद्धतीने काही राज्यांना संधी मिळते. यंदा मात्र महाराष्ट्राचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.

२६ जानेवारी रोजी दिल्लीमध्ये राजपथावर संचालनात सर्व राज्ये चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्राच्या चित्ररथाला आतापर्यंत सहा वेळा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. १९९३, १९९५ आणि १९९५ अशी तीन सलग वर्ष महाराष्ट्राने हा पुरस्कार पटकावला होता. तसंच २०१८ मध्येही चित्ररथासाठी पहिला क्रमांक मिळाला होता. महाराष्ट्राने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथ साकारला होता.

राजपथावर संचलन करण्यासाठी दरवर्षी काही ठराविक राज्यांनाच संधी दिली जाते. यावेळी १६ राज्यं आणि सहा केंद्रीय मंत्रालयं अशा एकूण २२ चित्ररथांचा समावेश करण्यात आला. दरम्यान पश्चिम बंगालचा चित्ररथ प्रस्तावही नाकारण्यात आला आहे. बंगालमधील कन्याश्री योजनेवर आधारित चित्ररथ करण्याचा प्रस्ताव होता. गेल्या पाच वर्षात दुसऱ्यांदा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. याआधी २०१५ मध्ये बंगालचा चित्ररथ नाकारण्यात आला होता. नागरिकत्व कायद्याला विरोध केल्यानेच यावेळी प्रस्ताव नाकारण्यात आल्याची टीका टीएमसी नेत्याने केली आहे.