राज्यातील ४० शिक्षक येत्या मंगळवारी सिंगापुर दौऱ्याला जाणार आहे. यात रायगड जिल्ह्य़ातील २ शिक्षकांचा समावेष आहे. सिंगापुरमधील शाळांना भेटी देऊन तेथील शिक्षणपध्दतीचा अभ्यास हे शिक्षक करणार आहेत.

अलिबाग तालुक्यातील होंडावाडी शाळेचे उपशिक्षक अमित पंडया व पनवेलच्या लाडीवली आदिवासी शाळेवरील शिक्षक प्रेमलाल धोबी या दोघांची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण दौऱ्याचा खर्च शिक्षक स्वत: उचलणार आहेत.

२३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत हा दौरा होणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या जागतिक क्रमवारीत युरोपीय देश आणि अमेरिकेला मागे टाकून पुढे गेलेल्या आशियाई देशांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक गुणवत्तेचा ‘अभ्यास’ करण्यासाठी राज्यातील शिक्षक उत्सुक आहेत. अशा उत्सुक शिक्षकांची पहिली तुकडी सिंगापूरला भेट देणार आहे.

शैक्षणिक  गुणवत्तेची चर्चा सध्या जोरात आहे. या पाश्र्वभूमीवर शैक्षणिक गुणवत्तेच्या जागतिक क्रमवारीत ग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ (पिसा) या अहवालानुसार आशिया खंडातील सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग हे देश सर्वांत पुढे

असल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे  राज्यातील गुरुजींनी गुणवत्तावाढीच्या पाहणीसाठी थेट फॉरेनला जाण्याचा बेत आखला आहे. पिसाच्या अहवालाचा उल्लेख राज्याच्या शैक्षणिक महाराष्टाच्या शासन निर्णयातही करण्यात आला आहे. जागतिक पातळीवरील युरोपीय देश, अमेरिका यांनाही मागे टाकून गुणवत्तेच्या जोरावर पहिले चार क्रमांक पटकावणाऱ्या या देशांमधील शिक्षण पद्धती नेमकी कशी आहे, विद्यार्थ्यांना ते कसे शिकवतात, कणत्या  पद्धती,  साधनांचा  वापर करतात, आपण कुठे कमी पडतो. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यास शिक्षक उत्सुक आहेत.

३४० इच्छुक, ४० जणांची पहिली तुकडी

शिक्षण विभागानेच शिक्षकांना या देशांत जाऊन अभ्यास करून येण्यासाठी प्रवृत्त केले आहे. परंतु हा अभ्यास दौरा प्रत्येक शिक्षक स्वखर्चानेच करणार आहे. शिक्षकांना जाण्याची परवानगी देणे, एवढीच शिक्षण विभागाची भूमिका आहे. कुणालाही कुठलीही आíथक मदत देण्यात आलेली नाही. ३४० शिक्षकांचे अर्ज आले होते. त्यापकी ४० जणांची पहिली तुकडी सिंगापूरला जाणार आहे. या दौऱ्यात ३ शाळाभेटी आणि तीन कार्यशाळांचा समावेश असून सिंगापूरच्या दौऱ्यात शिक्षक तेथील शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करणार आहेत. मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार हे सर्व सहभागी शिक्षकांसोबत सहभोजन करून त्यांना शुभेच्छा देतील. त्यानंतर ही पहिली तुकडी सिंगापूरकडे रवाना होईल.