News Flash

‘डॉक्टरेट’ प्राध्यापकांवर उचल घेऊन निर्वाह करण्याची वेळ

संदीप पाथ्रीकर या तरुणाच्या नावामागे दोन वर्षांपूर्वी ‘डॉ.’ अशी पदवी लागली.

डॉ. कृष्णा वैद्य उसाला पाणी देताना.

संदीप पाथ्रीकर या तरुणाच्या नावामागे दोन वर्षांपूर्वी ‘डॉ.’ अशी पदवी लागली. भूगोल विषयात त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळविली. आता ते एका महाविद्यालयात तासिका तत्त्वावर भूगोल विषय शिकवतात. मानधन मिळते फक्त सहा हजार रुपये, तेही सहा महिन्यांचेच. वर्षांच्या मानधनाची रक्कम ४८ हजार. मग घर कसे भागवायचे? संस्थाचालकांकडून उचल घेतली, ऊसतोड मजूर घेतात तशी. मिळालेल्या मानधनातले २० हजार रुपये संस्थाचालकांनी कापून घेतले. आता २८ हजार रुपयांत वर्षभरात संसाराचा गाढा ओढायचा कसा, या चिंतेने डॉ. संदीप हैराण आहेत. कारण गेल्या दीड वर्षांपासून पीएच.डी. आणि नेट-सेटधारक उमेदवारांची भरतीच झालेली नाही. व्यथा सांगताना त्यांना भरून आले होते. ते म्हणाले, ‘‘बायको शिकली आहे, नाही तर मागेच काडीमोड झाला असता.’’ डॉ. संदीप अशा ओढाताणीतून जाणारे एकटे प्राध्यापक नाहीत. तर हजारो तरुण भरतीची वाट पाहत आहेत. राज्यात तब्बल ९ हजार ५११ जागा रिक्त आहेत. त्यात मार्चमध्ये दोन हजारांची भर पडली आहे. एका विचित्र कोंडीत सारे जण सापडले आहेत. म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना नुकतेच औरंगाबादमध्ये निवेदन दिले. त्यात लिहिलेला मजकूर मन हेलावून टाकणारा आहे. ‘नोकरी देणार नसाल तर किमान मरण्याची तरी परवानगी द्या’ असा आशय त्यात आहे.

संदीप पाथ्रीकर यांनी भूगोल विषयात पीएच.डी. मिळवली तेव्हा रिक्त जागांवर नोकरी लागेल, अशी त्यांना आस होती. त्यांनाच नाही तर फुलंब्री तालुक्यातील पाथ्री गावात शेती करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांनाही आशा होती. म्हणूनच डॉ. संदीप यांचे लग्न लावून देण्यात आले. एक मुलगा झाला, पण नोकरी काही लागली नाही. शेवटी तासिका तत्त्वावर मिळणाऱ्या उत्पन्नातून भागणार कसे? पूर्वी मुलाला इंग्रजी शाळेत शिकवू असे वाटत होते, पण आता आर्थिक घडी काही बसली नाही. जटवाडा भागात भाडय़ाने राहणाऱ्या संदीपला त्यांची ‘प्राध्यापकीय’ प्रतिमाही जपावी लागते. सरकार काही तरी करेल असे वाटून संघटना काढली. निवेदने, आंदोलने केली. या सगळय़ाचा परिणाम आता संदीपच्या मुलावरही झाला आहे. आता संदीपने त्याच्या मुलाला इंग्रजी शाळेतून काढले. तेव्हा शाळेत खोटेच सांगितले- ‘मुलाला बाळदमा आहे.’ जगण्यासाठीच धावपळ करीत ते सरकारकडे आणि विरोधी पक्षांकडे सातत्याने निवेदने देतात. मागणी एकच, ‘जागा रिक्त आहेत. भरती करा. तसे करता येत नसेल तर किमान मानधन तरी २५ हजार रुपये करा.’ पण कोणी ऐकून घेत नाही.

संदीपचा मित्र कृष्णा वैद्य. मूळ जालना जिल्हय़ातील अंबडचा. औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात शिकला. समाजशास्त्रात ‘पीएच.डी.’ केली.  ‘आधुनिकीकरणाचा कोळी समाजावर झालेला परिणाम’ असा विषय. स्थलांतरासारख्या संवेदनशील विषयावर अभ्यास करणारा. आता नोकरी लागेल, या आशेवर निवेदने देताना आणि काही आंदोलनांत सहभागी झाला. प्राध्यापक होईल या आशेवर लग्न लावून दिलेले. मुलगी झाली. संसार सुरू झाला, पण नोकरी काही मिळेना. डॉ. कृष्णा वैद्य आता अंबडला गेले. स्थलांतरावर अभ्यास करणाऱ्या समाजशास्त्राच्या अभ्यासकाला स्वत:च गावी स्थलांतरित व्हावे लागले. वडिलोपार्जित १२ एकर शेतीत आता ते राबतात. १५ लाखांचे कर्ज काढले आहे. कोरडवाहू जमीन बागायती केली. ऊस लावला आहे. समाजशास्त्राचा प्राध्यापक होण्याचे स्वप्न घेऊन सर्व पात्रता परीक्षांमध्ये अव्वल ठरलेल्या कृष्णाला जेव्हा गावातील लोक विचारतात- शिकून तुम्ही काय दिवे लावले?-  तेव्हा बळेबळेच त्यांना म्हणावे लागते, ‘केवळ नोकरीसाठी शिक्षण नसते हो’, पण आतून त्यांना आपणच घेतलेल्या शिक्षणाची प्रतारणा होत असल्याची जाणीव होते. ते गहिवरतात. म्हणतात, केवळ राजकारणामुळे आमचे भविष्य अंधकारमय आहे. डॉ. संदीप पाथ्रीकर, डॉ. कृष्णा वैद्य जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पीएच.डी.नंतर नावामागे लागणाऱ्या ‘डॉक्टरेट’ला सांभाळण्यासाठी, ती प्रतिमा जपण्यासाठी उधारी करत आहेत आणि संस्थाचालकांकडून उचल घेऊन विद्यार्थ्यांना तासिका तत्त्वावर शिकवताहेत.

बहुतांशी शिक्षण संस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत. त्यांना अडचणी निर्माण व्हाव्यात म्हणून तर सरकार भरती प्रक्रिया टाळते का, अशी शंका डॉ. संदीप आणि डॉ. कृष्णा यांना आहे. म्हणूनच त्यांनी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. संघटनेमार्फत त्यांनी ४१ आमदारांना निवेदने दिली आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेटही घेतली आहे. आता आंदोलने करूनही ते थकले आहेत. संदीप सांगत होते, आता आंदोलनांचादेखील मुलांवर परिणाम आहे. आता मुलगाही निवेदन द्यायला चाललात का, असे विचारतो. त्याला उत्तर देता येत नाही. त्याने मागितलेली एखादी गोष्ट बाप म्हणून पूर्ण करता येत नाही. शिकलो खरे. त्यातील सर्वोच्च पदवीही नावाच्या पाठीमागे आहे, पण उपयोग काय? सालगडय़ाप्रमाणे किंवा ऊसतोड मजुराप्रमाणे आम्हीही उचल घेत आहोत. विशेषत: जेव्हा घरात कोणी आजारी पडते, तेव्हा तर पैशांची गरज लागते. तेव्हा संस्थाचालकच पाठीशी उभे राहतात. म्हणून तासिका तत्त्वावर किती का रुपये मिळेना, किमान पैसा हातात येऊ शकतो, असे वाटल्याने शिकवत आहोत की राबतो आहोत, माहीत नाही.

सरकारचे राजकारण?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 1:36 am

Web Title: maharashtra teachers in a bad condition 3
Next Stories
1 शहीद शुभम मुस्तापुरे यांना अखेरचा निरोप
2 नकारात्मक शेऱ्यानंतरही उद्योगमंत्र्यांकडून भूखंडाची बक्षिसी
3 दुर्दैव…! आठवडयाभराने भरलेल्या पाण्याच्या हौदात बुडून मुलाचा मृत्यू
Just Now!
X