News Flash

कडक उन्हाळा अनुभवणाऱ्या परभणीकरांना थंडीने जखडले

गेल्या काही वर्षांत परभणीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

भर उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक अनुभवणारे परभणीकर गारठलेल्या थंडीचा अनुभव सध्या घेत आहेत. अशा थंडीचा अनुभव प्रत्येक हिवाळ्यातच गेल्या काही वर्षांपासून येत आहे. उन्हाळ्यात ४६ अंशांपर्यंत तडकणारा पारा आता चक्क ४.१ अंश सेल्सिअसवर आला. वातावरणातला हा बदल परभणीकरांनाही चक्रावून टाकणारा ठरला आहे. उन्हाळा जसा तापदायक तशी गारठून टाकणाऱ्या थंडीची अनुभूती परभणीकर घेत आहेत.

गेल्या काही वर्षांत परभणीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दर उन्हाळ्यात याची प्रचिती परभणीकरांना येते. सुरुवातीला ४२, ४३ अंश सेल्सिअसपर्यंत उन्हाळ्यातले तापमान असे; पण आता पारा ४५ अंशांच्याही पुढे सरकू लागला आहे. एप्रिल, मे महिन्यातला हा तीव्र उन्हाळा परभणीकरांच्या आता सवयीचा झाला आहे. आधी उन्हाने लाहीलाही होत होती. आताही उन्हाळ्यातला उकाडा जीवघेणाच असतो. मात्र, हे वाढते तापमान हळूहळू सरावाचे होऊ लागले आहे. दर उन्हाळ्यात भरदुपारी रस्ते निर्मनुष्य दिसतात. सकाळी अकराच्या आत लोक आपली कामे आटोपतात आणि दुपारी चार, पाच नंतर बाहेर पडतात. हे आता नेहमीचेच उन्हाळ्यातले चित्र झाले आहे. गेल्या दोन वर्षांत परभणीच्या तापमानाने असाच उच्चांक प्रस्थापित केला होता. आता हिवाळ्यात पारा नीचांकी तापमान गाठत असल्याचाही अनुभव परभणीकरांनी घेतला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा जोरदार कडाका सुरू झाला. अन्य ठिकाणच्या तुलनेत परभणीत थंडीचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवू लागले. बाहेरून येथे आलेल्यांनाही परभणीची थंडी जास्त असल्याचे जाणवत होते. १२ जानेवारीला परभणीचे तापमान ५ अंश सेल्सिअसएवढे नोंदवले गेले; तर शुक्रवारी १३ जानेवारीला हे तापमान चक्क ४.१ अंश असे होते. या हिवाळ्यातला हा आकडा पुरेसा बोलका तर होताच; पण मराठवाडय़ात सर्वाधिक नीचांकी तापमान अशी या तापमानाची नोंद झाली. आता पुन्हा थंडी काही अंशी कमी झाली आहे. तरीही थंडीचा गारठा मात्र कायमच आहे. परभणी जिल्ह्यात आणखी चार ते पाच दिवस थंडी राहणार असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. या थंडीने गहू, हरभरा या पिकांसाठी वातावरण पोषक असल्याचे दिसून येत आहे. तर तूर व ज्वारी या पिकांना किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे जाणवत आहे. एकूणच परभणीतला हा वातावरणातला बदल लोकांनाही आश्चर्यचकीत करणारा ठरला आहे.

परभणीचे तापमान उन्हाळ्यात वाढणार हे गेल्या काही वर्षांत स्पष्ट झाले. जिल्ह्याचे वनक्षेत्र एक टक्काही नाही. त्यामुळे सतत उष्ण हवामान जाणवत आहे. दरवर्षीच हा उकाडा उन्हाळ्यात जीवघेणा ठरतो. जसा उन्हाळा तापदायक तसाच हिवाळाही परभणीकरांच्या कायम आठवणीत राहील; असाच अनुभवायला येत आहे. गेल्या काही वर्षांत यंदाचा हिवाळा नीचांकी तापमानाचा म्हणून नोंदवला जात असला, तरीही भविष्यात उन्हाळ्याप्रमाणे हिवाळाही असाच राहील काय, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:41 am

Web Title: maharashtra temperature 3
Next Stories
1 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात रणधुमाळी
2 सिंधुदुर्ग, जंजिरा किल्ल्याच्या पर्यटन करवसुलीसाठी पुरातत्त्व विभागाचा प्रस्ताव
3 ‘वाङ्मयचौर्य सिद्ध झाले, तर आपण लेखणी थांबवू’
Just Now!
X