आतापर्यंत चत्र महिन्याची सुरुवातही झाली नाही, तरीही चत्राचा वैशाख वणवा राज्यभर जाणवत आहे. राज्यातल्या निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. रायगड जिल्हा ही यात मागे नाही. जिल्ह्य़ाच्या अनेक भागात पाऱ्याने चाळीशी पार केली होती. भिरा येथे सर्वाधिक ४३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे.

वाढत्या तापमानामुळे रायगडकरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असून उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहे. सोमवारी दिवसभर शहरातील सर्वच खासगी कार्यालयांसह दुकानांमध्येही वातानुकूलित यंत्रांच्या वापरावर भर दिला जात होता. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील नोकरदारांसह बाळगोपाळांकडून शीतपेय व थंड फळहार करून शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. दिवसभर शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले होते. यामुळे खासगी वाहतूक बरोबरच एसटी महामंडळाच्या बसेसमध्येही तुरळक गर्दी दिसून आली. एकूणच रायगडकरांनी मंगळवारी दुपारी १२ वाजल्यानंतर  घराबाहेर पडणे टाळले. वाढत्या उष्म्याबरोबरच वाराही बंद असल्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत होती. दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर तर उत्तरेतील खालापूर, पाली या भागात तापमानाचा ज्वर अधिक होता. किनारपट्टीवरील अलिबाग, उरण, मुरूड, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये पारा ३५ ते ४६ अंशांच्या  दरम्यान घुटमळत होता.

हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी झाली. आतापर्यंत तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशाच्या आसपास स्थिरावत होता; मात्र रविवारी कमाल तपमानाने थेट चाळीशी पार केली. भिरा विद्युत केंद्रात  सर्वाधिक ४३ अंशांची नोंद झाली. एप्रिलअखेरीस

जिल्ह्य़ाचा पंचेचाळीशी गाठणार असल्याची शक्यता व्यक्त  होत असतानाच  मार्चअखेर पारा चाळीसवर गेल्यामुळे नागरिकांमध्ये उन्हाच्या दाहकतेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.