जळगावमधील साकळी येथून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून तरुणाच्या घराची पोलिसांनी झाडाझडतीही घेतली. यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

यावल तालुक्यातील साकळी या गावात राहणाऱ्या वासुदेव सूर्यवंशी या तरुणाच्या घरी एटीएसच्या पथकाने गुरुवारी दुपारी धडक दिली. सूर्यवंशीचा गॅरेजचा व्यवसाय असल्याचे समजते. एटीएसने तब्बल अडीच तास सूर्यवंशीच्या घराची झाडाझडती घेतली. त्याच्या घरातून पोलिसांनी संशयास्पद साहित्य जप्त केल्याचे वृत्त आहे. एटीएसच्या पथकाने सूर्यवंशीला ताब्यात घेतले असून त्याला घेऊन पथक मुंबईला रवाना झाल्याचेसांगितले जाते. सूर्यवंशी हा एका हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याते समजते. या कारवाईबाबत एटीएसने कोणतीही माहिती दिलेली नाही. सूर्यवंशी हा मूळचा मुक्ताईनगरमधील कर्की या गावातील रहिवासी असून तो सध्या साकळीत मामाच्या घरात राहत होता.