राज्यात करोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दिशेनं सरकारकडून दररोज नवनवीन उपाययोजना करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील सर्वच कारागृहातील सौम्य गुन्ह्यातील आरोपींना पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. त्यानंतर राज्यभरात असलेल्या तुरूंगातील कैद्याच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं पाच तुरूंगात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात औरंगाबादमधील हर्सूल तुरूंगात करण्यात येणार आहे.

राज्यातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आल्यानंतर राज्य सरकारनं कैद्यांची संख्या जास्त असलेल्या तुरूंगांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची माहिती दिली. ‘महाराष्ट्रातील तुरूंगामध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य सरकारनं औरंगाबाद येथील तुरूंगात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या काळात पोलिसांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था तुरूंगातच करण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात कुणालाही तुरूंगात प्रवेश करण्यास वा तुरूंगातून बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे,’ अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

‘राज्यातील तुरूंगामध्ये करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहेत. औरंगाबादमधील तुरूंगाबरोबरच लवकरच राज्यातील इतर पाच तुरूंगांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असंही देशमुख म्हणाले.

देशात करोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्याचा आकडा तीन हजारच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहेत. लॉकडाउनच्या काळात करोनाच्या प्रसाराचा वेग मंदावला असून, संसर्ग होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यातील स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य सरकारचं या दोन्हा शहरांकडे विशेष लक्ष आहे. राज्यात सध्या १२ जिल्ह्यामंध्ये हॉटस्पॉट आहेत.