गेल्या आठवड्याभरापासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आल असून काही ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या कमी होताना दिसत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यामध्ये काहीशी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात ११ हजार ७६६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५८ लाख ८७ हजार ८५३ झाली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ४०६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण काही दिवसांपूर्वीपर्यंत २५०च्याही खाली गेलं होतं.

आज दिवसभरात राज्यात ८ हजार १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त दिसत होता. आज मात्र, नव्या करोनाबाधितांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं आहे. आत्तापर्यंत राज्यात ५६ लाख १६ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४ टक्के नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४०६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण २५०च्याही खाली गेले असताना आज त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा १ लाख ६ हजार ३६७ झाला आहे.

आकड्यांची लपवालपवी?

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार करोनाविषयीची, विशेषत: मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रोज जाहीर केली जाणारी आकडेवारी कशी तयार केली जाते, हे सांगतानाच आरोग्य विभागाकडून अशा प्रकारची कोणतीही आकडेवारीची लपवालपवी होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

कशी होते रुग्णसंख्या, मृत्यूंची नोंद?

> केंद्र सरकार कोविड रिपोर्टिंगसाठी दोन पोर्टलचा वापर करते. १) आयसीएमआरचे सीव्ही अॅनालिटिक्स पोर्टल (बाधित रुग्णांसाठी) आणि कोविन १९ पोर्टल (मृतांच्या आकड्यांसाठी). या शिवाय प्रयोगशाळांसाठी आरटीपीसीआर ॲप आणि रुग्णालयांसाठी फॅसिलिटी ॲप वापरण्यात येते.

> प्रत्येक प्रयोगशाळा आपण केलेल्या नमुना तपासणीची व्यक्तीनिहाय माहिती आरटीपीसीआर ॲपद्वारे आयसीएमआरच्या सी.व्ही. अॅनालिटिक्स पोर्टलवर भरत असते.

> राज्यातील दैनंदिन आकडेवारी तयार करण्यासाठी रोज रात्री १२ वाजेपर्यंतची बाधित रुग्णांची यादी आयसीएमआरच्या सी.व्ही. अॅनालिटिक्स पोर्टलवरुन तर मृत्यूची यादी कोविड १९ पोर्टलवरून राज्य आणि जिल्हास्तरावर डाउनलोड करण्यात येते.

> यातून राज्य आणि जिल्हा स्तरावर दुहेरी नोंदी असलेले रुग्ण वगळण्यात येतात. साधारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खातरजमा केल्यानंतर सर्व जिल्ह्यांची अंतिम माहिती राज्य कार्यालयास प्राप्त होते. या माहितीच्या आधारेच राज्याचा अंतिम अहवाल आणि प्रेस नोट तयार केली जाते.

वाचा सविस्तर : राज्यात खरंच करोना मृतांची आकडेवारी लपवली जातेय का?

> रिकॉन्सिलिएशन अर्थात ताळमेळ प्रक्रिया साधारणपणे दर पंधरा दिवसांनी केली जाते. यात दोन्ही पोर्टलवरील माहिती आणि राज्य अहवाल यातील माहितीची तुलना केली जाते आणि तांत्रिक कारणाने झालेले फरक दूर केले जातात. प्रयोगशाळा आणि रुग्णालये अनेकदा जुनी माहिती पोर्टलवर अद्ययावत करतात. ही माहिती राज्य अहवालात घेता यावी आणि राज्य अहवाल अद्ययावत करता यावा यासाठी ही ताळमेळ प्रक्रिया आवश्यक असते.