08 August 2020

News Flash

शिवाजी महाराज आणि मराठा सम्राज्याशी संबंधित किल्ल्यांचे पावित्र्य जपणार; पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे

पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल’ अशी माहिती पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी दिली आहे. राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर हे स्पष्टीकरण पर्यटन विभागाने दिले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात, हे वृत्त पर्यटन विभागाने फेटाळून लावले आहे.

सिंगल यांच्या नावाने पर्यटन विभागाने जारी केलेल्या पत्रकामध्ये राज्यातील किल्ल्यांसंदर्भातील पर्यटन विभागाचे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. ‘राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. पहिले ‘वर्ग एक’ मधील आणि दुसरे ‘वर्ग दोन’मधील. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे ‘वर्ग एक’मध्ये येतात आणि अन्य सुमारे ३०० किल्ले हे ‘वर्ग दोन’ मध्ये येतात. ‘वर्ग एक’चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करते. या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम सरकारमार्फत हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल,’ अशी माहिती सिंगल यांनी दिली आहे.

”वर्ग दोन’मध्ये येणारे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्या परिसराचा पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये’, असं सिंगल यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2019 4:51 pm

Web Title: maharashtra tourism department refuses the news of heritage resorts on forts scsg 91
Next Stories
1 हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली गडकिल्ल्यांचं व्यावसायिकरण केलं जातंय- रेणुका शहाणे
2 आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत
3 शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
Just Now!
X