राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होताना दिसत आहे. तीन महिन्यानंतर राज्यातील करोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली. यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री काढले. या आदेशानुसार राज्यात करोना परिस्थितीनुसार ५ गट तयार करण्यात आले आहे. या पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी केली असून, त्यानुसार निर्बंध शिथिल केली जाणार आहे. ७ जूनपासून अनलॉक करण्यात येणार आहे. या आदेशानुसार अनलॉकसाठी पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची स्थिती यावरून ‘अनलॉक’चे पाच गट तयार करण्यात आले आहेत.

या पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी

पहिला गट

ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

दुसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

तिसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

चौथा गट

पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

पाचवा गट

पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.
अनलॉकच्या कोणत्या टप्प्यात किती जिल्हे?

हेही वाचा : ‘अनलॉक’चा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार निर्बंध

पहिल्या गटातील जिल्हे – अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा.

दुसऱ्या गटातील जिल्हे – औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी.

तिसऱ्या गटातील जिल्हे – अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ.

चौथ्या गटातील जिल्हे – पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

(असे गट तयार करण्यात आलेले असले, तरी सरकारने परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला/आपत्ती व्यवस्थापन समितीला दिलेले आहेत.)

हेही वाचा : Maharashtra Unlock : लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होणार का?; आदेशात महत्त्वाची माहिती

कोणत्या गटात काय सुरू होणार?

पहिला गट: या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार. रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी. लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या भागात जमावबंदीही नसणार आहे.

दुसरा गट : या गटात जे जिल्हे असतील तिथे सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटसाठीही ५० टक्के क्षमतेने परवानगी. लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ राहील. चित्रीकरण नियमितपणे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी लागू असेल.

हेही वाचा : Maharashtra Unlock: लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, प्रायव्हेट ऑफिसेस… कुठे काय सुरु काय बंद जाणून घ्या

तिसऱ्या गटामध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू तर वीकेंडला बंद राहतील.

चौथ्या गटामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर ५व्या गटातमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू राहतील तर वीकेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील. ३, ४ आणि ५ या स्तरांतील भागात इतरही अनेक निर्बंध कायम राहणार आहेत.