News Flash

Maharashtra Unlock : मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध होणार शिथिल?

राज्य सरकारकडून प्रत्येक आठवड्याला पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या याचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याविषयी वा वाढवण्याविषयी निर्णय घेतला जातो

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नवीन आकडेवारी राज्य सरकारकडून जाहीर

करोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचं चित्र आहे. दिवसागणिक राज्यातील नवीन करोनाबाधितांची संख्या कमी होत असून, सरकारने एप्रिलमध्ये लागू केलेले निर्बंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भात आणि दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पंचस्तरीय पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचं पाच गटात वर्गीकरण केलं जात असून, प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य सरकारने निर्बंध हटवण्यासंदर्भात पाच गट तयार केलेले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या यानुसार या जिल्ह्यांचं वर्गीकरण केलं जातं. सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट म्हणजेच ५ टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे. तर सर्वात जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत.

हेही वाचा- Maharashtra Unlock: लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, प्रायव्हेट ऑफिसेस… कुठे काय सुरु काय बंद जाणून घ्या

निर्बंध हटवण्यासंदर्भातील पंचस्तरीय कार्यपद्धती लागू करून दोन आठवडे झाले आहेत. पुढील आठवड्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. यात राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत पाच टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या पण आता पाच टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट आलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

पहिल्या गटातील जिल्हे (कंसात पॉझिटिव्हिटी रेट टक्क्यांमध्ये)

अहमदनगर (३.०६), अकोला (४.९७), अमरावती (१.९७), औरंगाबाद (२.९४), भंडारा (०.९६), बुलडाणा (२.९८), चंद्रपूर (०.६२), धुळे (२.४२), गडचिरोली (३.५३), गोंदिया (०.२७), हिंगोली (१.९३), जळगाव (०.९५), जालना (१.५१), लातूर (२.५५), मुंबई (३.७९), नागपूर (१.२५), नांदेड (१.९४), नंदूरबार (३.१३), नाशिक (४.३९), परभणी (०.९४), सोलापूर (३.७३), ठाणे (४.६९), वर्धा (१.१२), वाशिम (२.७९), यवतमाळ (३.७९).

पहिल्या गटात नसणारे जिल्हे (कंसात पॉझिटिव्ही रेट टक्क्यांमध्ये)

बीड (७.११), कोल्हापूर (१३.७७), उस्मानाबाद (५.२१), पालघर (५.१८), पुणे (९.८८), रायगड (१२.७७), रत्नागिरी (११.९०), सांगली (८.१०), सातारा (८.९१), सिंधुदुर्ग (९.०६), यवतमाळ (५.२४)

हेही वाचा- Maharashtra Unlock: नव्या नियमांमध्ये e Pass संदर्भातही मोठे बदल; अनेक जिल्ह्यांना दिलासा तर काही ‘जैसे थे’

पहिला गटात काय सुरू होणार?

पहिल्या गटात येणाऱ्या शहरांतील आणि जिल्ह्यांतील सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार. रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी. लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या भागात जमावबंदीही नसणार आहे.

पहिला गट

ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

हेही वाचा- Maharashtra Lockdown:…तर राज्यात पुन्हा नव्याने निर्बंध; ठाकरे सरकारचा इशारा

दुसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

तिसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

चौथा गट

पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

पाचवा गट

पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:34 pm

Web Title: maharashtra unlock updates maharashtra unlock guidelines latest news maharashtra unlock guidelines new restriction rules bmh 90
Next Stories
1 शिवसेना सर्टिफाईड गुंड असल्याच्या राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
2 Covid 19: महाराष्ट्रात पुढच्या दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती
3 महागाईच्या विरोधात सोलापुरात माकपचे आंदोलन
Just Now!
X