25 November 2020

News Flash

५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश, वडिलांचे गुण पाहून मुलगा भारावला

"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे किंवा प्रयत्नांती परमेश्वर या म्हणींचा प्रत्यय मला घरातच पाहायला मिळतो..."

शिक्षणाला वयाची अट नसते असं म्हटलं जातं, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन हे वाक्य खरं करुन दाखवलं आहे. नुकताच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. पदवी परीक्षेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावूक ट्विट केलं आहे.

“लहान वयातच घराची जबाबदारी खांद्यावर आल्याने एकनाथ शिंदे साहेब यांना एका मत्स्य वाहतूक व्यवसाय कंपनीत वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी नोकरीला सुरुवात करावी लागली. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिंदे साहेबांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले, पण शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी सोडली नव्हती. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे किंवा प्रयत्नांती परमेश्वर या म्हणींचा प्रत्यय मला घरातच एकनाथ शिंदे यांच्या अथक व अविश्रांत मेहनतीच्या रूपातून पाहायला मिळतो. अखंड,अविश्रांत मेहनतीची तयारी व जिद्द असेल तर आयुष्यात यशस्वी होता हे शिंदे साहेबांच्या आजच्या निकालातून सिद्ध होतं”, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी भावना व्यक्त केल्यात.


एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 77.25 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 11:00 am

Web Title: maharashtra urban development minister eknath shinde has become a degree holder tweets mp son shrikant shinde sas 89
Next Stories
1 मराठ्यांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कपटी राहिला आहे ! – चंद्रकांत पाटील
2 भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरोधात १५ कोटींच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल
3 लाथो के भूत बातों से नही मानते… आदेशानंतर संघर्ष करावाच लागेल; मनसे नेत्याचा सरकारला इशारा
Just Now!
X