महाराष्ट्रात सत्ता स्थापनेपूर्वी शिवसेना-भाजपामध्ये तीव्र मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाला ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम असल्याचे स्पष्ट केले.

भाजपा कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी मान्य करणार नाही. भाजपाने सर्वाधिक १०५ जागा जिंकल्या असून १० अपक्षांचा पाठिंबा मिळवला आहे. शिवसेनेने नव्या सरकारमध्ये अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली तर भाजपा हे मान्य करणार नाही असे भाजपामधील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम

शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही आहे. या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासह समसमान खातेवाटप करावे लागेल. महायुती २२० पेक्षा जास्त जागांवर विजयाचा दावा करत होती. पण भाजपाला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेचा भाव वधारला आहे.