नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. वेगवेगळया एग्झिट पोल्सचे आकडे पाहिले तर लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवले आहे. काँग्रेसच्या या यशामध्ये मोठा वाटा युवक काँग्रेसचा आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. युवक काँग्रेसने यावेळची विधानसभा निवडणूक लढवताना ‘सुपर ६०’ प्रोजेक्टची अंमलबजावणी केली. यामुळे काँग्रेसला २८ जागांवर विजय मिळवता आला. या जागा मागच्या निवडणुकीत काँग्रेसने अत्यंत कमी मतांच्या फरकाने गमावल्या होत्या.

युवक काँग्रेसच्या टीमने ४८ मतदारसंघात सहा महिने बूथ लेव्हल व्यवस्थापनापासून सोशल मीडियाच्या प्रसिद्धीचे काम पाहिले. करवीर, शहादा, जालना, जत, देगलुर, कोल्हापूर दक्षिण, रावरे आणि राजुरा या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने ‘सुपर ६०’ प्रोजेक्टची अंमलबजावणी केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली या प्रोजेक्टची अंमलबजावणी करण्यात आली. राजस्थान विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली होती.

अत्यंत कमी मतांच्या फरकाने आम्ही कुठल्या जागा गमावल्या आहेत. त्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले. शाहादाची जागा आम्ही फक्त २५० मतांनी आणि करवीरची जागा ५०० मतांनी गमावली होती. मतदारसंघातील विषयांचा आम्ही अभ्यास केला आणि तिथे पक्ष संघटना भक्कम करण्यावर भर दिला असे तांबे यांनी सांगितले. आधी आम्ही ६० जागा निवडल्या होत्या. त्यातल्या काही जागा मित्र पक्षाकडे गेल्या. त्यामुळे ४८ विधानसभा मतदारसंघात या प्रकल्पाची अंमलबजावणी केली.

युवक काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारसंघाची संपूर्ण माहिती घेतली. जातीय समीकरणे, पराभवाची कारणे जाणून घेतली. त्यामुळे स्थानिक नेत्यांना प्रशिक्षित करण्यात मदत झाली. आम्ही अत्यंत बारकाईने रणनिती आखली. मतदार यादीतून बोगस मतदारांची नावे काढून टाकली. आमचे प्रतिनिधी मतदारांपर्यंत पाठवले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यादृष्टीने प्रचाराची रणनिती आखली. ही सर्व माहिती पुण्यातील वॉर रुममध्ये पाठवली. जिथून उमेदवारांचे सोशल मीडिया अकांऊट हाताळले जात होते अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख मानस पागर यांनी दिली.