कृषी कायद्यांना महाराष्ट्र सरकार विरोध करतं आहे. मात्र सरकारचा हा विरोध बेगडी आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अधिवेशनात झालेल्या सत्रात बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच हे कायदे झाले. महाराष्ट्रात हे कायदे आत्ताही लागू आहेत. इथे हे कायदे लागू असताना केंद्राच्या कायद्यांना विरोध का केला जातो आहे? असाही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. १७ टक्के दलाली न देता कृषी माल विकायचा अधिकार शेतकऱ्याला हवा. हा उल्लेख शरद पवार यांच्या आत्मचरित्रात आहे. शरद पवार यांची मागणी योग्यच होती त्याचा विचार करुनच मोदी सरकारने कायदे अमलात आणले आहेत. मात्र राजकीय विरोधासाठी विरोध केला जातो आहे. नवे कायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहेत. मग हे सरकार विरोध का दर्शवतं आहे? या सरकारचा विरोध हा बेगडी आहे.

आणखी वाचा- “सत्ता डोक्यात जाता कामा नये,” कंगना आणि अर्णबच्या मुद्द्यावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक

जलयुक्त शिवार योजना तुम्ही बंद केली, खुशाल करा. जलयुक्त शिवारच्या चौकशीचे आदेश आपल्या खुर्चीवर मी बसलो होतो तेव्हाच दिले होते. तुम्ही खुशाल या योजनेची चौकशी करा या योजनेशी संबंधित ७०० तक्रारी आल्या होत्या. तुम्ही बोला आणि ५ हजार गावांचं कसं भलं झालं तो कार्यक्रम सादर करतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- …तर भाजपा रस्त्यावर उतरेल, फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला इशारा

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फक्त ३-३ हजारांचे चेक देण्यात आले. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय नाही का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.