एखाद दुसऱ्या दिवसाचा अपवाद  वगळता गेल्या आठ-दहा दिवसांपासून सोलापुरात तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर चढला असताना त्यात आता आणखी भर पडत आहे. रविवारी तर यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे उच्चांकी म्हणजे ४३.५ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदले गेले. सूर्यनारायण अक्षरश: आग ओकतो की काय, अशा दारुण परिस्थितीचा अनुभव सोलापूरकर घेत आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. एखाद दुसऱ्या दिवसाचा अपवाद वगळता ४२ अंशांच्या घरात तापमान स्थिरावले असताना त्यात पुन्हा वाढ होऊन तापमानाचा पारा पुढे सरकत असल्याने सोलापूरकरांच्या अंगाची नुसती काहिली होत आहे. काल शनिवारी तापमान ४२.५ अंश सेल्सियस इतके होते. रविवारी, दुसऱ्या दिवशी त्यात एका अंशाने वाढ होऊन ४३.५ अंश तापमान नोंदले गेले. सकाळी दहापासून उन्हाची तीव्रता  वाढत असून उष्म्याचा त्रास असह्य़ होत आहे. दुपारी बारा ते चापर्यंत रस्त्यावरील वाहतूक रोडावली आहे. जीवघेण्या उन्हात फिरणे कटाक्षाने टाळण्यात येत आहे. उन्हाच्या झळा सोसेनाशा झाल्या आहेत. तर बाजारपेठेत व कारखान्यांमध्ये श्रमिकवर्ग उन्हात काम करणे टाळून सावलीत विसावणे पसंत करीत आहे.

तथापि, एकीकडे उन्हाची तीव्रता वाढली असताना त्यापासून बचाव करण्यासाठी घरात-कार्यालयात विद्युत पंखे व अन्य वातानुकूलित यंत्रणेचा वापर करावा म्हटले तर वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे. रात्री देखील वारा खेळत नसल्याने उष्म्याचा त्रास जास्तच वाढू लागला आहे. वारा खेळत नसल्याने झाडाचे पानही हलेनासे झाले आहे. रात्री घराच्या गच्चीवर झोपले तरी हवेतील शुष्कतेमुळे शांत झोप येणे दुरापास्त झाले आहे.

विशेषत: वृद्ध मंडळी व बालगोपाळांना त्याचा विशेषत्वाने त्रास होत आहे. सायंकाळी उष्म्यापासून बचाव करण्यासाठी उद्यानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. उसाच्या रसपानाची दुकाने, आइस पार्लर, थंडगार लस्सी विक्रीची दुकाने गर्दीने फुलून जात आहेत.