निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा अनेक विघ्नांना तोंड देता देता गांजलेल्या जनतेने सोमवारी राज्यभरात विघ्नहर्त्यां गणरायाचे मात्र पारंपरिक उत्साहात स्वागत केले. दीड दिवसांपासून दहा दिवसांपर्यंतच्या गणेशोत्सवासाठी वाजतगाजत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ढोल-ताशे, झांज-मृदुंग आणि लेझीमसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजराने जसे जल्लोषी वातावरण ठिकठिकाणी होते तसेच अनेक ठिकाणी डॉल्बीच्या ढणढणाटाचीही लागण दिसून येत होती.
सोमवारी अनेक भागांत गणरायांचे आगमन होत असतानाच मुसळधार वृष्टीही झाल्याने आनंदाला उधाण आले होते. सोमवारचा दिवस हा मोदक, गोडाधोडाचे पदार्थ आणि लाडू, पेढय़ांनी गोडावला होता. त्याचबरोबर पूजाविधी, मंत्रोच्चारण, अथर्वशीर्षांचे पठण यांनीही आसमंत भारला होता.
मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्ली तर पुण्यात दगडूशेठ गणपती अशा मोठय़ा मंडळांच्या गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची जशी रीघ लागली आहे तशीच अनेक बडय़ा मंडळांची आरास पाहण्यासाठीही लोकांची गर्दी सुरू झाली आहे. गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्याने सोमवारी बाजारपेठांमध्ये रविवारइतकी गर्दी दिसत नव्हती. तरी मिठाईच्या दुकानांमध्ये मात्र मोदक आणि मिठाईसाठी रांगा लागल्या होत्या. फुलबाजारातली गर्दी पुढचे दहाही दिवस कायम राहणार आहे. अनेक घरांतल्या छोटय़ा पण सुबक गणेशमूर्तीपासून ते मोठय़ा मंडळांच्या महाकाय गणेशमूर्तीपर्यंत सर्वत्र पूजा सांगणाऱ्या गुरुजींची लगबग दिसून येत होती. गणपती बाप्पा मोरया हा गजरही निनादत होता. ऐन गणेशोत्सव काळात उत्तर प्रदेशात तणाव निर्माण झाल्याने राज्यभरातही पोलीस बंदोबस्त कमालीचा आहे. राज्यभर ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीसही तैनात आहेत.