श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरच करोनामुक्त होईल असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “राज्यावरील करोनाचे संकट दूर कर… महाराष्ट्राला लवकर करोनामुक्त कर,” असे साकडे अजित पवार यांनी गणपती बाप्पांना घातले आहे. बाप्पांच्या आगमनाने घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचे भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव करोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन साजरा करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

“कोरना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही. बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी श्रीगणेशोत्सवासंदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील करोनाचा संसर्ग रोखला जाईल तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर करोनामुक्त होण्यास मदत होईल, असा मला विश्वास आहे,” असंही अजित पवार म्हणाले. गणेशोत्सव काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी सर्वांना केलं आहे.

कुठल्याही गणपतीच्या दर्शनाची परवानगी नाही

पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी करोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करु नये. ‘करोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनी शुक्रवारीच केल्या आहेत. विधानभवनात पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. “करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील करोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देऊन काम करावे. तसेच करोनाबरोबरच पावसाळयातील अन्य संसर्गाचे आजार व सारी आजाराच्या रुग्णांवर वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” अशा सूचनाही पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.