ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दावा

बीड : तीन राज्यात अनेक वर्षे भाजपची सत्ता असल्याने या वेळी सत्ता मिळाली नसली तरी जागा फारशा कमी झाल्या नसल्याने या निवडणूक निकालाचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम होणार नाही. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता येणार, असा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. माझी भूमिका करमणुकीसाठी नव्हे तर सर्वसामान्यांचे भविष्य घडवणारी आहे असे सांगत, भाषण आणि अभिनय करून वारसा येत नाही, तो रक्तात असावा लागतो, अशा शब्दांत थेट नामोल्लेख न करता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

बीड जिल्ह्यात गोपीनाथगड (ता. परळी) येथे बुधवारी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत दोन दिवसीय आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, संयोजक खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे या वेळी समाजातील वेगवेगळ्या घटकांना आधार देण्याचा कार्यक्रम याठिकाणी घेण्यात आला. या वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, देशातील पाच राज्यातील निकालात तीन राज्यांत अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असल्यामुळे त्याठिकाणी भाजपला सत्ता मिळाली नसली तरी निवडून आलेल्या आमदारांची संख्या कमी नाही. त्यामुळे सत्ता मिळाली नसली तरी पक्षाचा पराभव झाला असे म्हणता येणार नाही. तीन राज्यातील निकालाचा महाराष्ट्रात काहीही परिणाम होणार नाही.

मात्र, काही जण या राज्यातील निकालावर मोठमोठी विधाने करत आहेत. त्यांचा पक्ष राज्याच्या बाहेर कोणाला माहीत तरी आहे का, असा सवाल करत आपली राजकारणातील भूमिका मनोरंजनासाठी नाही तर सामान्य माणसाचे भविष्य घडवण्यासाठी आहे, असे त्या म्हणाल्या.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी तिघी बहिणींना कोणत्याही परिस्थितीशी  हिमतीने लढण्याचा संस्कार दिला असून सर्वसामान्यांच्या विकासासाठीच आम्ही कुटुंबाचा वेळ राजकारणासाठी देत आहोत. त्यामुळे जनतेनेही साथ द्यावी, असे आवाहन केले. तर दुष्काळी परिस्थितीमुळे, आर्थिक अडचणीमुळे व्याधी अंगावर घेऊन फिरणाऱ्या सामान्य माणसाला व्याधी मुक्त करण्यासाठी हा आरोग्ययज्ञ सुरू केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींची छाया दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. मागील चार वर्षांत आपण मुंडेंचा राजकीय व सामाजिक वारसा चालवण्याचा प्रयत्न आपल्या परीने करत आहोत. दिवंगत मुंडेंची चाळीस वर्ष आणि माझी चार वर्षे याची तुलना न करता भविष्याचा विचार करून सकारात्मक प्रतिसाद द्या, अशी सादही त्यांनी घातली. मुंडे यांनी गृहमंत्री असताना मुंबईतील गुन्हेगारी मोडून काढली. तशीच जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढण्याचे काम आपण केले असून जिल्ह्यापुरती मीच गृहमंत्री असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.